नगर : पाडळी ग्रामसेविकेस शिवीगाळ, धमकी ; दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नगर : पाडळी ग्रामसेविकेस शिवीगाळ, धमकी ; दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : भावाच्या घरकुलाच्या बँक खात्याला लावलेला होल्ड काढण्यासाठी ग्रामसेविकेस दोघांनी शिवीगाळ केली. अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणला. कार्यालयात कोंडून घेण्याची तसेच आमच्यावर केस केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना पाडळी येथे शुक्रवारी (दि.31) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंजाबापू यादव कांबळे व येशूदास यादव कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. ग्रामसेविका पुष्पा गायके या पाडळी ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारी सरकारी काम करत होत्या. यावेळी मंजाबापू कांबळे व येशूदास कांबळे तेथे आले.

मंजाबापू याच्या घरकुल बँक अकाऊंटला होल्ड लावलेला आहे. तो काढा अन्यथा मी तुम्हाला कामकाज करुन देणार नाही, असे म्हणुन येशूदास याने ग्रामसेविका गायके यांना शिवीगाळ केली. अंगावर धावून येत टेबलवरील सर्व रजिस्टर व कागदपत्रे फेकून दिले. ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावेळी ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी वेळीच मदतीला धावला. त्यानंतर ग्रामस्थही आले. त्यानंतर काबंळे बंधू तेथून निघून गेले. त्यानंतर ग्रामसेविका गायके यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी ग्रामसेवक संघटेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Back to top button