ढोरजळगाव : दुधाच्या टेम्पोतून प्रवास करणं विद्यार्थिनींच्या बेतले जीवावर ! | पुढारी

ढोरजळगाव : दुधाच्या टेम्पोतून प्रवास करणं विद्यार्थिनींच्या बेतले जीवावर !

ढोरजळगाव; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. बस वेळेवर न आल्याने शाळेला उशीर झाला म्हणून दुधाच्या टेम्पोत बसून शाळेला जात असताना टेम्पोला अपघात झाला. या अपघातात विद्यार्थिनी बसलेला हा टेम्पो उलटल्याने 10 ते 15 विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. दोन विद्यार्थिनींना गंभीर जखमा झाल्याने उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी निंबेनांदूर येथील विद्यार्थिनी एस.टी. बसने प्रवास करतात.

गुरुवारी (दि.30) या विद्यार्थिनींना ढोरजळगाव येथे जाण्यासाठी एस.टी. बसची वाट पहात उभ्या असताना, दररोज येणारी शेवगाव-माका बस न आल्याने नाईलाजास्तव गावातून ढोरजळगावला जाणार्‍या दुधाच्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने बसावे लागले. टेम्पो पुढे निघाला असताना निंबेनांदूर जवळ आल्यानंतर हॉटेल सायली समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो अचानक पलटी झाला.

टेम्पोत बसलेल्या 32 विद्यार्थिनींपैकी 15 ते 16 विद्यार्थीनी जखमी झाल्या आहेत. अनेकांना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटल उपचार सुरू आहेत. तर, यातील दोन विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. जखमींमध्ये पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनी असून, यात वैष्णवी पालवे, सुकन्या बडे, साक्षी बडे, हर्षदा वाकडे, अंजली वाकडे, आकांक्षा राक्षे, श्रद्धा राक्षे, कावेरी शिंदे आदींचा समावेश आहे.

तासन् तास स्टँडवर उभे राहावे लागते
एस.टी. बस वेळेवर येत नाही, विद्यर्थिनींना तासन् तास ताटकळत स्टँडवर उभा रहावे लागते. घरी जायला अंधार होतो, म्हणून अनेकवेळा ग्रामस्थ व शाळा प्रशासनाने शेवगाव आगारप्रमुखांना लेखी निवेदने दिले आहे. तसेच रास्ता रोकोचा इशाराही देण्यात आला. परंतु, उत्पन्नाचे कारण देण्यापलीकडे आगार प्रमुखांनी काहीही केले नाही. मिरीमार्गे नगरसाठी अत्यंत कमी बस असून, त्याही कधी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळेच ही घटना घडली असून, याला सर्वस्वी शेवगाव आगार व्यवस्थापक जबाबदार आहे.

..अन्यथा परिणामांना सामोरे जा!
एस. टी. प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा संतप्त पालक सुनील बडे, बाबा पालवे, वसंत बडे, रज्जाक शेख, राजेंद्र बडे, शहादेव वाकडे, दीपक वाकडे, विशाल वाकडे आदींनी दिला आहे.

Back to top button