नगर : कल्याण रस्त्यावरील हुक्का पार्लरवर छापा | पुढारी

नगर : कल्याण रस्त्यावरील हुक्का पार्लरवर छापा

नगर; पुढारी वृत्तसेवा : कल्याण रोडवरील रेल्वे पटरीजवळ एका गाळ्यात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. 14 हजार 600 रुपये किमतीचे हुक्का साहित्य जप्त करून, हुक्का चालविणारा मालक व त्याचा कामगार या दोघांसह पाच हुक्का ओढणार्‍या, अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे हवालदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे. ओंकार संतोष शिंदे हा हुक्का चालविणारा व तेथे काम करणारा कामगार किरण अनिल शेळके (दोघे रा.कल्याण रोड) या दोघांसह पाच हुक्का ओढणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम पंकज खंडेलवाल (रा.गंजबाजार), प्रथम पराग गुजर (रा.गुलमोहर रोड), रोहित राकेश दहिवाळ (रा.नालेगाव), ऋषिकेश चंद्रशेखर पुंड (रा.बालिकाश्रम रोड), भावेश संदीप गांधी (रा.बुरुडगाव रोड) या पाच हुक्का ओढणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवालीचे ठाणेदार चंद्रशेखर यादव यांना खबर्‍याकडून माहिती मिळाली होती की, कल्याण रोडला रेल्वेपटरी जवळ एका गाळ्यात हुक्का पार्लर सुरू आहे.

या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे शोध पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे व त्यांच्या पथकाने बुधवारी (दि.29) छापा टाकला असता तेथे हुक्का ओढत असताना काही जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सिगारेटे पाकीट व हुक्का साहित्य असा 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Back to top button