..अन्यथा श्रीरामपूर शहर बंदचा इशारा | पुढारी

..अन्यथा श्रीरामपूर शहर बंदचा इशारा

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पालिकेच्या परवानगीची गरज पडते. तर पालिकेचा ‘ना हरकत’ दाखला नसतानाही पोलिसांनी अनधिकृत पाळणा ठेकेदारांना पाळणे चालवण्याची अधिकृत परवानगी दिलीच कशी? असा सवाल करीत प्रशासनच जर अशी दुटप्पी भूमिका निभावत असेल तर शंभर वर्षांची परंपरा असलेला श्रीरामनवमी उत्सवानिमीत्त निघणारी प्रभू श्रीरामाचा रथ मिरवणूक न काढता शहर बंद करण्याचा इशारा भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिला आहे.

तालुक्याचे न्याय दंडाधिकारी तथा तहसिलदार प्रशांंत पाटील यांच्या दालनात शहर पो. नि.हर्षवर्धन गवळी, पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा कमेटीचे सर्व सदस्य व भाजपाचे कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठक झाली. यावेळी चित्ते बोलत होते. श्रीरामपुरातील श्रीरामनवमी यात्रेबाबत 94 वर्षात पहिल्यांदाच दडपशाहीमुळे पाळणा खेळण्यांवर भितीचे सावट आल्याने यंदा पाळणे ‘फिरतील की नाही’ या विषयावर चर्चा कमी आणि तक्रारी जास्त झाल्या. त्यामुळे दालनातील वातावरण थोडेसे गरम झाले होते.

विहिंपचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ यांनीही आक्रमक पवित्रा घेत प्रशासनास दोष दिला. पोलिस प्रशासनाने खासगी पाळणाधारकांना कोणत्या आधारे ‘ना हरकत दाखला दिला’ हा सवाल त्यांनी उपस्थीत केला. काही महिन्यांपूर्वी विहिंपने शहरातील अतिक्रमणाबाबत पालिकेबरोच पोलिसांनाही निवेदन दिले होते. तेंव्हा याच पोलिस आधिकार्‍यांनी पालिककडे बोट दाखविले होते. तेच पोलिस आज कायद्याची पायमल्ली करीत आहे. सर्व कायदे बाजूला ठेवून खासगी पाळणा चालकांना परवानगी देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्याची उम्मीद न केलेलीच बरी शहरात कायदा आणि सुव्यवस्थाच राहीलेली नसल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला.

यात्रा कमेटीचे सदस्य व हिंद सेवा मंडळाचे संचालक अशोक उपाध्ये यांनी खासगी पाळणा चालकांना परवानगी का दिली असा सवाल पो.नि.हर्षवर्धन गवळी केला. यावर दि. 26 मार्च रोजी रितसर जागा मालकाचे सर्व कागदपत्रे बघूनच दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पालिकेने यात्रा कमेटीला ना हरकत दाखला दिला असेल तर त्यानाही परवानगी देवू, असे सांगितले. यावर खासगी पाळण्यांची परवानगी रद्द करण्याची उपाध्ये यांनी केली.

मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. यात्रा कमेटीचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी प्रशासन जर आम्हाला संरक्षण देण्यास सक्षम नसेल तर पैसे भरुन आम्हाला त्रास करुन घ्यायचा नाही, असे म्हणत यात्रा कमेटीच्या लेटर हेडवर पोलिसांना परवानगी मागूनही त्यांनी फक्त अध्यक्षांच्या सहीवर परवानगी नाकारली असे सांगत नाराजी व्यक्त केली.

Back to top button