संगमनेर : मळीच्या टँकरखाली सापडून विद्यार्थी ठार | पुढारी

संगमनेर : मळीच्या टँकरखाली सापडून विद्यार्थी ठार

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर महाविद्यालयातून वडगाव पान येथे आपल्या घरी जात असणार्‍या अनिकेत संजय गडगे याच्या स्कुटीला टँकरने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात टँकरच्या चाकाखाली सापडून अनिकेत जागीच ठार झाल्याची घटना कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील समनापूर गावात घडली.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी असणारा अनिकेत गडगे हा संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान वर्गात शिकत होता. तो महाविद्यालयातून वडगाव पान येथे आपल्या मोपेडवरुन कोल्हार- घोटी राज्यमहा मार्गाने घरी जात असताना पाठीमागून आलेल्या मळीच्या टँकरने धडक दिली. या अपघातात अनिकेत हा टँकरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.

या अपघाताची माहिती समजतात पोलिस घटनास्थळी आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतली. अपघात झाल्यानंतर अनिकेत याच्या पाठीवरील दप्तर तसेच रस्त्यावर पडले होते. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली होती. या घटनेबाबत पोलिसांनी प्रथमता अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Back to top button