नगर जिल्ह्यातील 4841 हेक्टर पिकांना तडाखा | पुढारी

नगर जिल्ह्यातील 4841 हेक्टर पिकांना तडाखा

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 15 ते 18 मार्च या कालावधीत अवकाळी पावसाने तडाखा दिला. यात 4 हजार 841 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका जिल्ह्यातील 8 हजार 894 शेतकर्‍यांना बसला. या शेतकर्‍यांना नुकसानीपोटी आर्थिक मदत अदा करण्यासाठी 8 कोटी 46 लाख 76 हजार रुपयांचा निधी मिळावा असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली.

नदी, नाले वाहिल्यामुळे भूजलपातळी चांगली राहिली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात बहरली. पिके काढणीला आली असतानाच, 15 ते 18 मार्च या कालावधीत पाऊस, वादळी वारे आणि गारपीट झाली. या अवकाळीचा फटका जिल्ह्यातील 129 गावांतील रब्बी पिके तसेच फळबागांना बसला आहे. या अवकाळीमुळे 4 हजार 841 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला. जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 6 हजार 800 रुपये, बागायती पिकांसाठी 13 हजार 500 तर फळबागांसाठी हेक्टरी 18 हजार रुपये अनुदान बाधित शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.

नगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान
नगर तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 32, नेवासा तालुक्यात 923, संगमनेर तालुक्यात 913, श्रीरामपूर तालुक्यात 630 व राहुरी तालुक्यात 482 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसानीपैकी 4 हजार 330 हेक्टर क्षेत्र बागायती पिकांचे आहे. बागायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये हेक्टरी अनुदान दिले जाणार आहे.

Back to top button