महाआवास अभियानात नगर जिल्हा राज्यात अन् जामखेड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर | पुढारी

महाआवास अभियानात नगर जिल्हा राज्यात अन् जामखेड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : अमृत महाआवास अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आतापर्यंत 16 हजार 500 घरे पूर्ण करून राज्यात सर्वोच्च राहण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात जामखेड प्रथम क्रमांकावर असून तालुक्यात 2011 घरे पूर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे अभियान 31 मार्च रोजी संपत आहे. या कालावधीत जामखेड तालुक्याने प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वाधिक 1610, तर राज्यपुरस्कृत योजनेची 401 अशी एकूण 2011 घरे पूर्ण केल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.

अभियान कालावधीत सर्वाधिक घरे पूर्ण करण्यात पंचायत समितीचे सर्व संबंधित अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, केंद्रचालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, साळवे साहेब आणि टीम यांनी सातत्याने पाठपुरावा केला, असे पोळ यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाची मदत
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी गौण खनिजाबाबत वेळोवेळी मदत केल्याने काम अधिक सोपे झाले. जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सक्रिय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनीही घरकुल भेटी देताना अधिकारी-कर्मचार्‍यांना मोठी मदत केली.

पत्रकारांचाही वाटा
या यशात जामखेड तालुक्यातील पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. कधी झाली नव्हती एवढी जाणीव जागृती पत्रकारांनी केली. काही गावांत वर्तमानपत्रांतील बातम्यांचे फ्लेक्स लागले. हे महाराष्ट्रात फक्त जामखेडमध्ये घडले आहे.

Back to top button