देवळालीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण | पुढारी

देवळालीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील देवळाली परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गौरव एकनाथ भिंगारे या तरुणाने तिच्या राहत्या घरातून अपहरण केले. ही घटना 26 मार्च रोजी पहाटेच्या दरम्यान घडली असून पोलिस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 15 वर्षे 4 महिने वय असलेली आणि 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी ही देवळाली परिसरात तिच्या कुटुंबासह राहते.

दिनांक 25 मार्च रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही तीच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. त्यानंतर दिनांक 26 मार्च रोजी पहाटे एक वाजेच्या दरम्यान ती मुलगी तिच्या खोलीतून अचानकपणे बेपत्ता झाल्याचे दिसून आले. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तिचा घरात व आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

ती मुलगी घरात काही एक न सांगता कपडे व बॅग घेऊन निघून गेली आहे. तेव्हा आरोपी गौरव एकनाथ भिंगारे, राहणार देवळाली प्रवरा (ता. राहुरी) याने आपल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय तीच्या नातेवाईकांना आला.
घटनेनंतर मुलीच्या काकाने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गौरव एकनाथ भिंगारे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनेत वाढ होत आहे.

Back to top button