राहता : भाजपाची कार्यपद्धती जनतेला अमान्य : आ. थोरात | पुढारी

राहता : भाजपाची कार्यपद्धती जनतेला अमान्य : आ. थोरात

राहता/शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसह लोककल्याणाचे अनेक निर्णय घेतले. भाजपची कार्यपद्धती ही जनतेला मान्य नाही. सत्ता असूनही नगर-मनमाड रस्ता वर्षानुवर्षे का पूर्ण होत नाही? असा सवाल करतानाच शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उघडवा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, मुजीब शेख, महेंद्र शेळके, अनिल भांगरे, तालुकाप्रमुख सचिन कोते, रावसाहेब बोठे डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, सुरेश थोरात, श्रीकांत मापारी, प्रभावती घोगरे, जनार्दन घोगरे, विक्रांत दंडवते, समीर दंडवते, समीर करमासे, नंदकुमार सदाफळ, अण्णा कोते, अरुण कडू, प्रवक्ते ताराचंद म्हस्के उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अत्यंत सहज पद्धतीने शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. कोरोना काळात या सरकारने चांगले काम केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. मात्र मागील नऊ महिन्यांपासून आलेल्या सरकारने एकमेकांवर केलेले आरोप, त्यांच्या वागण्याची पद्धती हे पाहता राजकारणाचा पोत सध्या रसातळाला गेला आहे. सुप्रीम कोर्टातून नक्की न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना त्याच क्षणाला राज्यातील सरकार कोसळेल. कारण भाजपची कार्यपद्धती जनतेला मान्य नाही.

3560 किलोमीटर पदयात्रा करणार्‍या राहुल गांधींच्या प्रश्नाला देशाचे पंतप्रधान उत्तर देत नाहीत. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्याकरता धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. राहता तालुका पूर्वी वैभवशाली तालुका होता. 40 ट्रक पेरू या तालुक्यातून जात होते. ऊस, पाटपाणी अशी समृद्धी असलेल्या या तालुक्याचा विकास खुंटला आहे.

शेती महामंडळाचा साठ वर्षे सुरू असलेला लढा आपण महसूल मंत्री झाल्यानंतर तातडीने सोडवला. मात्र या प्रश्नाच्या संघर्षाला इतकी वर्षे का लागली हे ओळखा. याचे कारण म्हणजे जनतेला पिचवत ठेवण्याचे झुलवत ठेवायचे हे येथील राजकारण आहे. आपण सर्वसामान्य जनतेबरोबर असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मजबूतपणे एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले

आ. डॉ. तांबे म्हणाले की, सध्या देशात लोकशाहीची घसरण होते आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम सुसंस्कृत राजकारण केले आहे. विचारांची बांधिलकी ठेवली आहे. यावेळी भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के, प्रभावती घोगरे, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले, सुधीर मस्के, प्रमोद लबडे, अशोक थोरे, नानाभाऊ बावके, मनसेचे विजय मोगली, धनंजय गाडेकर आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी गणपतराव सांगळे, नवनाथ महाराज आंधळे, संदीप विघे, शिवाजी ठाकरे, विक्रांत दंडवते, सचिन गाडेकर, दीपक सोळंकी, अनिता काळे, एल. एम. डांगे आदींसह महाविकास आघाडीतील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एकनाथ गोंदकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज लोंढे यांनी आभार मानले.

सर्व निवडणुका ताकदीने लढवा
संपूर्ण राज्यात आणि नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. बाजार समितीसह येणार्‍या सर्व निवडणुका लोकशाही पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण ताकदीने लढवा. विजय आपला नक्की होणार असून परिवर्तनाची सुरुवात होईल, असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला.

Back to top button