‘डिटेक्शन ब्रँचेस’ला मक्तेदारीची लागण ! | पुढारी

‘डिटेक्शन ब्रँचेस’ला मक्तेदारीची लागण !

श्रीकांत राऊत : 

नगर : पोलिस ठाण्यांमधील डीबी अर्थात गुन्हे शोध पथकांमध्ये काही कर्मचार्‍यांची मक्तेदारी वाढल्याची कुजबूज पोलिस दलात सुरू आहे. कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात असलेल्या डिटेक्शन बँ्रच आणि एलसीबीमध्ये काही कर्मचार्‍यांची मक्तेदारी वाढल्याचे थेट पोलिस कर्मचारीच खासगीत बोलून दाखवित आहेत. पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांनंतर गुन्हे शोध पथकांची झाडाझडती होणार आहे. त्यामुळे एलसीबी आणि गुन्हे शोध पथकांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर कर्मचारी नेमावेत, अशी भावना पोलिस कर्मचार्‍यांची आहे.
शहरातील कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथके कार्यरत आहेत.

असे असताना शहरात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, मंगळसूत्र हिसकावणे अशा घटनांत मोठी वाढ झाली आहे. सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी असलेली ही गुन्हे शोध पथके डिटेक्शन ऐवजी भलत्याच कामांत आपली ऊर्जा घालवित असतात. सोबतच पथकातील काही हिरे त्या-त्या पोलिस ठाण्यातील हद्दीत अवैध धंदे, दारू, मटका, जुगार अड्डे चालविणार्‍या गुन्हेगारांकडून वसूली करत असल्याचेही लपून राहिलेले नाही. काही कर्मचार्‍यांच्या अशा कार्यशैलीमुळे सर्वच पोलिस कर्मचारी बदनाम होत असतात. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कितीही मोठी घटना घडो, गुन्ह्याचा तपास पथके कशा पद्धतीने करतात, याचेही अनेक किस्से चर्चिले जात असतात. पोलिस दलातील अंतर्गत बदल्या येत्या काही दिवसांत होणार आहेत.

पोलिस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहायक फौजदार या पदांवर पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. कामचुकार आणि गुणवत्ता नसलेले कर्मचारी मलईदार ठिकाण मिळावे यासाठी आटापिटा करीत आहेत. ठिकाण कोणतेही मिळो, काम गुन्हे शोध पथक वा एलसीबीत मिळण्यासाठी सगळी खटपट असते. अशा मक्तेदारीमुळे इतर कर्तबगार पोलिस कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याची भावना खुद्द पोलिस ठाण्यातील कर्मचारी खासगीत बोलून दाखवित आहेत. त्यामुळे वशिल्यावाल्या आणि शिफारशीलाल पोलिस कर्मचार्‍यांची यावेळी नाकाबंदी होते की, नाही? हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

एलसीबीच्या बदल्यांकडे नजरा
स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या मनुष्यबळापैकी 40 कर्मचारी बदलीस पात्र असल्याची माहिती आहे. यातील काहींनी एलसीबीतच राहण्यासाठी आटापिटा सुरू केलाय म्हणे. त्यातील काही तर कागदोपत्री आपल्या केसेसचे उद्दिष्ट पूर्ण करणारे आहेत. त्यामुळे एलसीबीच्या बदल्या केंद्रस्थानी असणार आहेत.

‘एलसीबी’साठी फिल्डिंग
एलसीबी म्हणजे जिल्हा पोलिस दलाची सशक्त ब्रँच होय. जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत या शाखेचा मुक्त संचार असतो. शाखेचा प्रमुख होणे जसे अनेक ठाणेदारांचे स्वप्न असते तसेच शाखेत काम करता यावे, यासाठी कर्मचारी फिल्डिंग लावत असतात. एवढे महत्त असलेल्या एलसीबीत मागच्या दरवाजाने येणार्‍यांची फिल्डिंग एसपी मोडीत काढतात की नाही, हेही पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Back to top button