राहुरी : फायनान्स कंपनीची 2 लाखांची फसवणूक | पुढारी

राहुरी : फायनान्स कंपनीची 2 लाखांची फसवणूक

राहुरी ; पुढारी वृत्तसेवा : फायनान्स कंपनीत वसुली फिल्ड अधिकारीपदी काम करणार्‍या अनिल पंडित याने ग्राहकांकडून गृह कर्जाचे हप्ते वसूल केले, मात्र रक्कम बँकेच्या खात्यावर न भरता स्वतःच वापरली. अशाप्रकारे पंडित याने फायनान्स कंपनीची 2 लाखांची फसवणूक केली.

गोविंद देविदास डंगाले (वय 40 वर्षे) हे राहुरी येथील बस स्थानक परिसरात रोशन कॉम्प्लेक्स येथे सुवर्णा प्रगती हौसिंग मायक्रो फायनान्स प्रा. लि. शाखेत एरिया मनेजर आहेत. त्यांच्या कंपनीमार्फत गृहकर्ज वाटप व वसुली असे अधिकृतरित्या कामकाज केले जाते. या शाखेंतर्गत अनिल पंडित (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर) यास कलेक्शन फिल्ड अधिकारीपदी नेमले होते. त्याच्याकडे कंपनीमार्फत वाटलेल्या ग्राहकांच्या कर्जाचे हप्ते वसुली करून, कंपनीच्या बँक खात्यात रक्कम जमा करून, दैनंदिन हिशोब सादर करण्याची जबाबदारी होती.

अनिल पंडित याने (दि. 6 जून 2021 ते 5 नोव्हेंबर 2022) दरम्यान हे कामकाज करताना वेगवेगळ्या ग्राहकांकडून गृह कर्जाचे हप्ते रोख स्वरुपात व ऑनलाईन पेंमेटच्या माध्यमातून स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये 1. 72 लाख रुपये जमा करून घेतले. जमा रक्कम कंपनीकडे कुठला हिशोब न देता किंवा कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून, कंपनीची व ग्राहकांची फसवणूक केली. अपहार केलेली रक्कम घेऊन तो पसार झाला आहे. ही बाब फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविंद देविदास डंगाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल पंडित याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. मेघशाम डांगे हे पसार अनिल पंडित याचा शोध घेत आहेत.

Back to top button