नगर : 3500 शाळांना दोन कोटींचे क्रीडा साहित्य ! | पुढारी

नगर : 3500 शाळांना दोन कोटींचे क्रीडा साहित्य !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  खासगी शाळांच्या तुलनेत झेडपीच्या शाळा कात टाकताना दिसत आहेत. लोकसहभागातून शाळांमध्ये शैक्षणिक, भौतिक सुविधा दिल्या जात आहे. आता विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्हावेत आणि निरोगी असावे, या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत क्रीडा साहित्य संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रत्येक शाळेवर पुरवठादाराकडून हे साहित्य उतरविले जाणार असले, तरी अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे क्रीडांगण विकास योजनेतून ही कामे करून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनाच पाठपुरावा करावा लागणार असल्याची चर्चा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गुणवत्ता वाढीवर भर दिला आहे. त्याचबरोबर आता समग्र शिक्षणचे अधिकारी रमेश कासार यांच्या पाठपुराव्यातून शासनाकडून मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी क्रीडा साहित्यही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर झळकणार हसू
सन 2022-23 या वर्षात शारीरिक शिक्षण व क्रीडा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इ.1 ली ते 5 वी , इ. 6 वी ते 8 वी, 9 वी ते 12 वी साठी वेगवेगळ्या साहित्याचे संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

साडेतीन हजार शाळांना फायदा
जिल्ह्यातील सुमारे 3500 शाळांना क्रीडा साहित्य संच मिळणार आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च शासन करत आहे. मुलांना शाळेतच खेळाची गोडी निर्माण होऊन, त्यांचे आरोग्यही चांगले राहणार आहे.

साहित्य खरेदीचे अधिकार कोणाला?
समग्र शिक्षा अंतर्गत मप्राशिप, मुंबई कार्यालयाने हे संच उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या साहित्याची खरेदी देखील शासन स्तरावर झाल्याचे समजले आहे. क्रीडा साहित्य संच आणि त्याच्या वापरावर येरेकर यांचे लक्ष असणार आहे.
कोणकोणते साहित्य भेटणार
इ. 1-5 ः टेनिस बॉल, फ्रिसबी, रबर रिंग, मल्टि कलर, काईट बॅग इत्यादी.
इ. 6-8 ः टेनिस
बॉल, व्हॉलिबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन रॅकेट, बॅडमिंटन नेट, बॅटमिंटन शटल, बास्केट बॉल,
वूडन क्रिकेट बॅट, स्टम्प, इत्यादी. इ. 9 ते 12 ः टेनिस बॉल, व्हॉलिबॉल, थ्रो बॉल, बॅटमिंटन शटल,
हॅण्डस्टिच फूटबॉल, क्रिकेट बॅट, कीट बॅग.

क्रीडांगणच नाही, खेळायचे कुठे ?
शासनाने नगर जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांना सुमारे दोन कोटींचे क्रीडा साहित्य दिले आहे. मात्र, अनेक शाळांना मैदाने नाहीत. काही शाळांची मैदाने क्रीडांगण विकास योजनेतून मंजूर झाली, मात्र कामांच्या निविदा प्रक्रियेतील गोंधळामुळे त्यांची कामे थांबलेली आहे. सीईओंनी याप्रकरणात लक्ष घालून ही कामेही मार्गी लावण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे.

Back to top button