नगर : जिल्ह्यात 1.23 कोटी क्विंटल साखर उत्पादन | पुढारी

नगर : जिल्ह्यात 1.23 कोटी क्विंटल साखर उत्पादन

नगर ; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांची गव्हाण यंदा सुरु होती. जिल्ह्यात आतापर्यंत 1 कोटी 23 लाख 94 हजार 728 मेट्रीक टन उसाचे गाळप झाले. त्यातून 1 कोटी 19 लाख 44 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सध्या चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून, येत्या तीन चार दिवसांत या कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होणार आहे.

गेल्या वर्षी प्रमाणापेक्षा अधिक ऊस उपलब्ध होता. त्यामुळे काही कारखान्यांच्या परिसरातील ऊस एप्रिल महिना संपला तरीही, गाळप झाला नव्हता. त्यामुळे जून महिन्याच्या दुसर्‍या आठवडयापर्यंत गाळप सुरु होते. यंदाच्या वर्षी मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस कमी होता. कारखान्यांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु झाला. यंदाच्या वर्षी सोपानराव धसाळ कारखान्याची पहिली चाचणी झाली. एकंदरीत यंदा जिल्ह्यातील 23 कारखान्यांनी हंगाम सुरु केला. यामध्ये 13 सहकारी व 10 खासगी कारखान्यांचा समावेश होता.

या कारखान्यांचा हंगाम बंद :
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, गणेश, अशोक, श्रीगोंदा, अगस्ती, कुकडी, केदारेश्वर, डॉ. विखे पाटील, ज्ञानेश्वर, मुळा, हे सहकारी तसेच क्रांती, पियुष, अंबिका, साईकृपा, प्रसाद, जयश्रीराम व युटेक हे खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगामाची सांगता झालेली आहे. अद्याप सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, वृध्देश्वर, गंगामाई व कोळपेवाडी या कारखान्यांचा गळीप हंगाम सुरुच आहे.

साखर उतारा सरासरी 9.64 टक्के :
जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 9.64 टक्के इतका आहे. सहकार महर्षी थोरात कारखान्याचा उतारा सर्वाधिक 11.93 इतका आहे. कर्मवीर काळे कारखान्याचा उतारा 11.52, विखे पाटील कारखान्याचा उतारा सर्वात कमी आहे.

Back to top button