आकारी पडितांनी संघर्षासाठी सज्ज राहावे : अ‍ॅड. अजित काळे | पुढारी

आकारी पडितांनी संघर्षासाठी सज्ज राहावे : अ‍ॅड. अजित काळे

माळवाडगाव : पुढारी वृत्तसेवा : हरेगाव मळा शेतीमहामंडळ पंचक्रोशीतील गावोगावचे शेतकरी गेली 20 वर्षांपासून आकारी पडीत जमिनी मिळविण्यासाठी लढत आहेत. राज्यात खंडकरांच्या वारसांना जमिनीचेच वाटप झाले. परंतु आकारी पडीत शेतकर्‍यांचे जमीन वाटपाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होतो आहे. यासाठी येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता श्रीरामपूरात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या संघर्ष लढ्यासाठी लाभधारक शेतकरी वारसांनी सज्ज राहण्याचे आवाहन संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचे विधीज्ञ अ‍ॅड. अजित काळे यांनी केले.

आकारी पडीत शेतकर्‍यांचे वतीने उच्च न्यायालयात शेतकर्‍यांचे बाजूने भक्कमपणे लढा देणारे अ‍ॅड. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळवाडगाव येथे आकारी पडीत शेतकर्‍यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. आकारी पडीत शेतकर्‍यांचा लढा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आकारी पडीत शेतकर्‍यांना जमिनी मिळवून देण्यासाठी माझ्यावर केसेस झाल्या तरी चालतील. परंतु या 9 गावाच्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत राहील.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले, देशाला स्वतंत्र्य मिळून सत्तर वर्षांचा मोठा कालावधी लोटाला. इंग्रज राजवटीत घेतलेल्या हक्काच्या जमिनीसाठी स्वातंत्र्यानंतरही सात दशकापर्यंत न्यायालयीन व रस्त्यावरचा लढा द्यावा लागतो. त्याचबरोबर सुदैवाने जिल्ह्याला गेली वीस वर्षापासून महसूलमंत्री पदे मिळाले. परंतु अकारी पडीत शेतकर्‍यांचा प्रश्न सुटला नाही, हे दुर्दैवी आहे.
यावेळी कॉ. अण्णापाटील थोरात अंबादास आदिक, वसंतराव मुठे, अ‍ॅड. प्रसन्न बिंगी, सुरेश ताके, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, युवराज जगताप, सुदामराव औताडे, दिलीप गलांडे, साहेबराव चोरमल, विजयराव शेळके, दगडू आसने, रमेश आढाव, चंद्रभान चोरमल, डॉ. दादासाहेब आदिक, बाळासाहेब बकाल, सुरेश डाके, लक्ष्मण चिडे, बाळासाहेब आसने, बाळासाहेब हुरुळे, भारत शिंदे, गणपतराव आसने, शिवाजीराव रुपटक्के, भारत शिंदे, जयदीप आसने, प्रमोद आसने, विठ्ठल आसने, सुनील आसने, भरत आसने, अनिल आसने, अरुण आसने, भाऊसाहेब आसने, गोकूळ त्रिभुवन, दिगंबर आढाव, सुभाष आसने, पांडुरंग पवार, सुभाष मुठे, मच्छिंद्र हुरुळे, डॉ. इलियास पठाण आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी विठ्ठलराव आसने यांनी सूत्रसंचालन केले.

रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी : काळे
ब्रिटिश शासनाने 1918 साली 30 वर्षाच्या कराराने शेतकर्‍यांच्या जमिनी विकसित करून परत देण्याच्या बोलीवर घेतल्या होत्या. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि सदर जमिनी या राज्यकर्त्यांनी महामंडळाच्या नावे केल्या. या शेतकर्‍यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी आता आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या हक्काच्या जमिनी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन अ‍ॅड. अजित काळे यांनी केले.

Back to top button