नगर : बाजार समितीत विजय खेचून आणू : आमदार नीलेश लंके | पुढारी

नगर : बाजार समितीत विजय खेचून आणू : आमदार नीलेश लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपणास सर्व 18 जागा निवडून आणायच्या आहेत. एकदिलाने निवडणूक लढवू व विजयश्री खेचून आणू, असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंंगळवारी (दि.28) पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आ.लंके बोलत होते. मेळाव्यास अशोक सावंत, बाबाजी तरटे, सुदाम पवार, प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष विजय औटी, किसनराव रासकर, खंडू भुकन, डॉ. आबासाहेब खोडदे, रा. या. औटी, बा. ठ. झावरे, इंद्रभान गाडेकर, मारूती रेपाळे, नंदकुमार देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षातील कोणा इच्छुकास आपल्या मंडळाकडून निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्यांचा विचार करू. ज्यांना तालुक्यातील वातावरण संघर्षशील ठेवायचे आहे, ते आपल्याकडे येणार नाहीत. आपण जिंकणारच आहोत. परंतु, इतका फरक का पडला, याचा समोरच्याने दहा वेळा विचार केला पाहिजे, असा टोलाही त्यांनी नाव न घेता लगावला.

निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. तालुक्याच्या सर्व भागांमध्ये उमेदवारी द्यावी लागेल. मागील वेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल. निवडणुकीसाठी परस्पर अर्ज दाखल करू नका. जे परस्पर अर्ज दाखल करतील, त्यांनी तो ठेवायचा की काढायचा, याचा निर्णय स्वत:च घ्यायचा आहे. पक्षाच्या प्रक्रियेतून दाखल झालेला अर्जच अधिकृत समजला जाईल, असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

प्रसंगी मला विरोध करा, तुम्ही एकत्र रहा !
राजकारणामुळे भावा-भावांमध्ये वाद करू नका. एकत्र रहा. एकवेळ मला विरोध करा. मात्र, तुमच्यातला वाद मिटवून घ्या. आपल्या राजकारणासाठी गावागावांत, घराघरात वाद नको. त्याचा फायदा काही राजकारणी घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देऊ नका, असा सल्ला आमदार लंके यांनी दिला.

Back to top button