नेवासा : अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित; आंदोलनाचा इशारा

नेवासा : अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित; आंदोलनाचा इशारा
Published on
Updated on

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या नेवासा महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी तहसीलदार व कृषी अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यावेळी जाब विचारत सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. सात दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, तर पाचेगाव व बेलपिंपळगाव फाट्यावर 5 एप्रिलला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.
2022च्या पावसाळ्यात संपूर्ण नेवासा तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतातील सर्वच पिकाचे नुकसान झाले.

खर्च करूनही उत्पादन निघालेले नसल्याने शेतकरी कर्जबाजारी, संकटात सापडला आहे. सर्वच तालुक्यात अतिवृष्टी असतानाही पर्जन्याची विरोधाभासी नोंद महसूल विभागाच्या चुकीमुळे झाली आहे. यामुळे नेवासा तालुक्यातील हजारो शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिले. याचा निषेध करत अतिवृष्टी अनुदान त्वरित मिळावे या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.27) तहसीलदार संजय बिरादार यांना देण्यात आले.

यावेळी बेलपिंपळगाव सरपंच चंद्रशेखर गटकळ, पाचेगाव माजी सरपंच दिगंबर नांदे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, श्रीधर तुवर, शेतकरी संघटनेचे हरीभाऊ तुवर, बाळासाहेब शिंदे आदींनी महसूल व कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराचा व सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करीत आपले मनोगत व्यक्त केले. अतिवृष्टी अनुदान त्वरित न मिळाल्यास शेतकरी मोठे जनआंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले की, मार्च महिना संपला तरीही काही शेतातील पाणी हटले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तालुक्यातील आठ महसूल मंडळापैकी पाच महसूल मंडळ अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. सुरुवातीला शासनाने अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे करून घेतले. आज दोन-तीन महिन्यानंतर 65 मिलीमीटर पेक्षा जास्त झालेल्या पावसाचा निकष लावण्यात आला व तालुक्यातील तीन मंडळांना अतिवृष्टी अनुदान देण्यात आले.

शासनाचे शेतकर्‍यांबाबत असलेले दुटप्पी धोरण पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वांचे सारखे नुकसान झालेले असतानाही काही शेतकरी तुपाशी व काही शेतकरी उपाशी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. तरी राहिलेल्या पाच ही महसूल मंडळातील शेतकर्‍यांना अतिवृष्टी अनुदान मिळावे, अशी मागणी वंचित राहिलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी निवेदनात केली आहे.

निवेदनावर अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, पाचेगाव सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, दत्तात्रय पाटील, वामनराव तुवर, जालिंदर विधाटे, दिलीप पवार, शांताराम तुवर, विठ्ठल गोलेचा, सुधाकर शिंदे, दीपक चौघुले, प्रभाकर चौघुले, शरद शिंदे, पंढरीनाथ राहिंज, आण्णासाहेब वैद्य, शिवनाथ पुंड, बाळासाहेब भांड, अमोल कोकणे, पोपट सरोदे, प्रकाश जोशी, गिताराम साठे, किरण साठे आदी उपस्थित होते.

वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा शासन दरबारी निर्णय झाला नाही, तर 5 एप्रिल रोजी सर्व शेतकर्‍यांतर्फे पाचेगाव व बेलपिंपळगाव फाट्यावर प्रशासनाला कोणतीही पूर्व सूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच, 10 एप्रिल रोजी गावातील सर्व शाळा, शासकीय कार्यालय व गाव बंद ठेवण्याचा इशारा निवेदन दिला आहे.

मिळाली 'ती' रक्कमही तुटपुंजी
शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊनही तालुक्यातील काही शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. ज्या शेतकर्‍यांना पैसे मिळाले 'ती' रक्कमही तुटपुंजी आहे. नेवासा तालुक्यात विमा कंपनीचे कार्यलय नाही. पीक विमा प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या तक्रारी घेण्यासाठी उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली.

निवेदनाबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवणार आहोत. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

                                     – संजय बिरादार, तहसीलदार, नेवासा

तीन महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. उर्वरित पाच महसूल मंडळ सततच्या पावसाच्या छायेत येत असल्याने त्या महसूल मंडळांना शासकीय अतिवृष्टी अनुदान प्राप्त झाले नाही. तसेच, तालुक्यातील पीक योजनेत सहभाग घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांना पीक विम्याची परताव्याची रकम जमा होईल.

                           – दत्तात्रय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news