आप करणार ‘चिपको आंदोलन’; नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर मोठ्या वृक्षांची बेकायदा कत्तल | पुढारी

आप करणार ‘चिपको आंदोलन’; नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर मोठ्या वृक्षांची बेकायदा कत्तल

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील मोठ्या वृक्षांची बेकायदा कत्तल केली जात आहे. याविरुद्ध आम आदमी पार्टी चिपको आंदोलन करणार असल्याचे अ‍ॅड. सादिक शिलेदार यांनी सांगितले. सध्या नेवासा ते श्रीरामपूर रस्त्याचे काम चालू आहे. नेवासा ते पाचेगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठी चिंचेची तसेच इतर झाडे आहेत.

रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांनी वन विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करून चिंचेची, तसेच इतर झाडांची कत्तल केली आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून झाडांची कत्तल थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा आम आदमी पक्षाच्या वतीने हरित लवादाकडे तक्रार करण्यात येईल.

झाडांची कत्तल न थांबवल्यास आम आदमी पार्टीतर्फे झाडांना चिपको आंदोलन करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सादीक शिलेदार, राजू आघाव, देवराम सरोदे, प्रवीण तिरोडकर, भाऊसाहेब बेल्हेकर, अण्णा लोंढे याच्या सह्या आहेत. या आंदोलनासंदर्भात प्रशासन काय भूमिका घेणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Back to top button