शेवगाव : मंडळ अधिकारीच टीप देत होता मुरूम माफियांना

शेवगाव : मंडळ अधिकारीच टीप देत होता मुरूम माफियांना

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : मंडळ अधिकार्‍यास हाताशी धरून दिंडेवाडी परिसरातून हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर छापा मारण्यास गेलेल्या अधिकार्‍याची खबर तस्कारला देणार्‍या मंडळ अधिकार्‍यास तहसीलदारांनी चांगलेच धारेवर धरल्याचेही जोरदार चर्चा आहे. तालुक्यातील उजाड खडकाळ माळराणावर असलेल्या दिंडेवाडी परिसरातून गेल्या कित्येक दिवसांपासून अनाधिकृत मुरूमाचे उत्खनन होत आहे.

या उत्खननातून आजतागायत हजारो ब्रॉस मुरूमाची चोरी करून वडुले, वाघोली, आव्हाणे, अमरापूर, दिंडेवाडी, ढोरजळगाव, निंबेनांदूर आदी परिसात विकण्यात आला आहे. विशेष म्हणजे उत्खनन करणार्‍या व्यक्तीने मंडळातील महसूल मंडळ अधिकार्‍यास हाताशी धरल्याने त्याला कसली भीती वाटत नाही. उलट तहसीलदार किंवा इतर अधिकारी या परिसरात आल्यास त्वरित त्याची खबर देण्याची सतर्कता मंडळ अधिकारी आवर्जुन बाळगतात.

खबर्‍याच्या श्रीमुखात लगावल्याची चर्चा
या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरूम उचलला जात असल्याची माहिती तहसीलदार छगन वाघ यांना मिळाल्याने शनिवारी (दि.25) ते छापा मारण्यास गेले. तेथे मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे हजर असलेल्या एका खबर्‍याचा फोन तहसीलदारांनी हिसकावून घेतला आणि त्याचवेळी त्या फोनवर आलेला कॉल त्यांनी स्वत: उचलला असता 'तहसीलदार आले आहेत, तेथून वाहणे पसार करा,' अशी खबर मंडळाधिकारी देत असल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याच कालावधीत संताप अनावर झालेल्या तहसीलदारांनी एवढ्या वेळेस माफ करा, अशी विनंती करत असलेल्या एका खबर्‍याच्या श्रीमुखात लगावल्याची माहिती आहे. अधिकारी आल्याची कुणकुण लागल्याने ते घटना स्थळी पोहचण्यापूर्वीच उत्खनन करणारे जेसीबी, पोकलेंड, ट्रॅक्टर तेथून पसार करण्यात आले.

अधिकार्‍यावर राजकीय दडपण
तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर तेथील तलाठ्यास पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पंचनामा करण्यात आला असून, याबाबत अधिकार्‍यावर राजकीय दडपण आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. मात्र, मुरूम उत्खनन कोण करतेय? याची माहिती मंडळाधिकार्‍यांना असल्याचे घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. याची माहिती घेऊन त्या व्यक्तीसह मंडळाधिकार्‍यावर अवैद्य खनिज उत्खननचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news