संगमनेर शहरातील घुलेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

संगमनेर शहरातील घुलेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकामध्ये दिवसाढवळ्या एका महिलेला फेरफटका मारत असलेल्या बिबट्याने दर्शन दिले. मात्र त्या महिलेच्या पाठीमागे बिबट्या असल्याचे तिच्या ध्यानी मनी नव्हते. तिने मागे वळून बिबट्याला पाहिले असते, तर तिची पाचावर धारणा नक्कीच झाली असती. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी संगमनेर शहरातील तिरंगा चौकाजवळ असणाऱ्या झाडाझुडपात रात्रीच्या वेळी बिबट्या आल्याची माहिती परिसरातील तरुणांना मिळाली. त्यानंतर तरुणांनी फटाके फोडून, तर काही जणांनी पिकप गाडी आत घुसवून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अर्धा पाऊणतास प्रयत्न करूनही तो सापडला नाही. मात्र त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्या आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

एकता चौकात आज रविवारी एक महिला रस्त्याने जात असताना ती पुढे गेली असता अचानक पलीकडील बाजूच्या भिंतीवरून बिबट्या उडी मारून रस्त्यावर आला आणि पुन्हा माघारी फिरला हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. बिबट्याचे आगमन झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button