‘शेळी-मेंढी पालन’ कार्यालय पारनेरला : खासदार सुजय विखे | पुढारी

‘शेळी-मेंढी पालन’ कार्यालय पारनेरला : खासदार सुजय विखे

टाकळी ढोकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेळी-मेंढीपालन महामंडळाचे पहिले कार्यालय पारनेर येथे सुरू करून धनगर समाज व शेतकर्‍यांना 10 हजार कोटींचे कर्जवाटप करणार असल्याचे खासदार डाँ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. वासुंदे (ता.पारनेर) येथे जि.प.माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा, जलजीवन मिशनच्या साडेचार कोटींच्या कामाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यात खासदार विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले होते. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, राहुल शिंदे, सुरेश पठारे, अश्विनी थोरात, सोन्याबापू भापकर, अ‍ॅड. रघुनाथ खिलारी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, राजेश भंडारी, सचिन वराळ, रंगनाथ सैद आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, सहकार नेते म्हणून मिरविणार्‍यांनी मागील काळात सहकार मोडीत काढून सहकारी साखर कारखाने चक्क कवडीमोल भावात नातेवाईकांना विकले. ते आमच्यावर चोर-दरोडेखोर म्हणून टीका करतात. हे किती हास्यास्पद आहे. अशा लोकांना त्यांच्याच भाषेत आता उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्तेत असताना विरोधकांनी सत्तेचा उन्माद माजविला होता. जनता बाहेर आणि वाळूतस्कर आत, अशी परिस्थिती होती. आता आपले सरकार राज्यात आले. वाळूतस्करी बंद करून पालकमंत्र्यांनी वाळू लिलाव बंदचा निर्णय घेतला. आता स्वस्तात घरपोच वाळू सरकार देणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडीबद्दल विखे म्हणाले, सत्ता मिळत नाही, ती हिसकून घ्यावी लागते. पारनेर तालुक्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी कर्डिले म्हणाले, दिवंगत माजी आमदार वसंतराव झावरे यांचे तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. दूधउत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यावर्षी मार्च नंतर मागेल त्याला खावटी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. नाबार्डच्या माध्यमातून नवीन शाखा देण्याचा प्रयत्न करू. सुजित झावरे म्हणाले, मला बदनाम करण्याचे षड्यंत्र कायमच चालू असते. राजकारण वेगळ्या दिशेला गेलेले आहे. नशिबात असेल तेच मिळत असते. पारनेर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सूत्रसंचालन अशोक चेमटे व प्रसाद झावरे यांनी केले, आभार वसंत चेडे यांनी मानले.

Back to top button