नगर जिल्ह्यातील 2.66 लाख महिलांचा प्रवास | पुढारी

नगर जिल्ह्यातील 2.66 लाख महिलांचा प्रवास

नगर; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजना अंतर्गत महिलांना बस प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार 289 महिलांनी या योजनेचा लाभ घेत एसटीतून प्रवास केला. यापोटी शासनाकडून 82 लाख 67 हजार रुपयांची रक्कम महामंडळाला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन झाल्यापासून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 33 टक्के सवलत आहे. त्यामुळे अनेकांचे शिक्षणात एसटी महामंडळाचा सहभाग महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून 65 वयोमान झालेल्या नागरिकांना 50 टक्के प्रवास भाड्यात सवलत सुरु आहे. 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना नुकताच एसटीचा प्रवास मोफत केला. त्यामुळे वयोवृध्द नागरिकांचे देवदर्शन आणि पाहुणचार वाढला आहे.

राज्य शासनाने नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये महिलांना आर्थिक दिलासा दिला. 17 मार्चपासून प्रत्येक महिलेला एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी 50 टक्के भाड्यात सवलत सुरु झाली आहे. 17 मार्च ते 23 मार्च या सात दिवसांच्या कालावधीत 2 लाख 66 हजार 289 महिलांनी महामंडळाच्या बसमधून प्रवास केला आहे. या सवलतीच्या प्रतीपूर्तीपोटी राज्य शासनाकडून 82 लाख 67 हजार 928 रुपये रक्कम एसटी महामंडळाला मिळणार आहे.

‘पॅकेज टूर’मध्येही राहाणार सवलत
एसटीच्या अहमदनगर विभागामार्फत पॅकेज टूरचे आयोजन करण्यात येते. महिला प्रवाशांसाठी ‘महिला स्पेशल पॅकेज टूर’चे आयोजन करण्यात येत आहे. या पॅकेज टूरमध्ये महिलांना महिला सन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरी जिल्ह्यातील महिलांनी एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले.

Back to top button