

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : लष्कराच्या के. के. रेंज हद्दीमधून गौण खनिज चोरी करून त्याची बेकायदा वाहतूक करणारा डंपर व गौण खनिजासह 8 लाख 10 हजार किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी पकडला. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिसांचे पथक शुक्रवारी (दि.24) पहाटे 2.30 वाजता नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन करत होते.
यावेळी निंबळक चौकाजवळ गणेश शेषराव नागरे (रा.गाडगीळ पटांगण, नालेगाव) याच्या ताब्यातील डंपर (क्र.एमएच 12 ईएफ 1266) मध्ये 3 ब्रास गौण खनिज मुरुमाची वाहतूक करताना आढळला. पोलिस पथकाने त्याला थांबविले असता खारे कर्जुने गावाजवळील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीमधून उत्खनन मुरुम करून आणल्याची माहिती दिली. याबाबत हवालदार संदीप खेंगट यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी गणेश नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.