शेवगाव तालुका : घुलेंच्या वर्चस्वाला राजळे धक्का देणार? | पुढारी

शेवगाव तालुका : घुलेंच्या वर्चस्वाला राजळे धक्का देणार?

रमेश चौधरी

शेवगाव तालुका : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. या निवडणुकीत घुलेंच्या वर्चस्वाला आमदार मोनिका राजळे धक्का देणार का, याबाबत उत्सुकता आहे. शिवाय प्रथमच कार्यक्षेत्रातील शेतकरी उमेदवारी करण्यास पात्र असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. संचालक पदाच्या 18 जागांसाठी येत्या 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला असून, यासाठी तालुक्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या संस्थेवर माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले यांचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादीची हक्काची संस्था म्हणून याकडे पाहिले जात असल्याने, या समितीच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. मात्र, अपवाद वगळता या संस्थेला निवडणुकीस सामोरे जावे लागले.

सन 2015-16 मध्ये स्व. राजीव राजळे व दिलीपराव लांडे यांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उभे केल्याने, निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि 9 ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत पुन्हा राष्ट्रवादीची हुकूमत कायम राहिली. मात्र, विरोधकांनी अर्धी मते घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले. सन 1955 साली या बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर सन 1957 ला प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले. अनेक वर्षे स्व. मारूतराव घुले पाटील, त्यांच्या पाठोपाठ घुले बंधूंनी ही संस्था उभारीस आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तरीही लोकशाही पद्धतीने या संस्थेला वेळोवेळी निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. गत निवडणुकीनंतर सन 2020-21 मध्ये मुदत संपलेल्या या संस्थेची निवडणूक कोरोनामुळे पुढे जात राहिली. ती आता होत आहे. आता संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरीही उमेदवारीस पात्र असल्याच्या शासनाच्या नवीन धोरणानुसार बाजार समितीची निवडणूक होणार आहे.

आ. राजळे प्रतिआव्हान देणार का?
दरम्यान, जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी शेवगाव येथे घेतलेल्या मेळाव्यात आमदार मोनिका राजळे यांच्यावर टिकेची झोड उठविली. कोणत्याही परिस्थितीत पाथर्डी बाजार समिती ताब्यात घेणार, असे आव्हान आ. राजळेंना दिले. त्यामुळे आ.राजळे शेवगाव बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरून घुले यांना प्रती आव्हान देतात का, याबाबत उत्सुकता आहे. निवडणूक लढविण्याबाबत भाजपा कार्यकर्ते आग्रही आहेत. अनेक शेतकरी समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने, सर्वांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

संचालक पदाच्या 18 जागा
सोसायटी मतदारसंघातून 11 (सर्वसाधारण 7, महिला 2, इतर मागासवर्गीय 1, विमुक्त जाती, भटक्या जमाती 1), ग्रामपंचायत मतदारसंघातून 4 (सर्वसाधारण 2, अनु.जाती,जमाती 1, आर्थिक दुर्बल घटक 1), व्यापारी-आडते मतदारसंघातून 2, हमाल-मापाडी मतदारसंघातून 1, अशा संचालक पदासाठी एकूण 18 जागा आहेत.

एकूण 2 हजार 187 मतदार
शेवगाव बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदार संघात 911 मतदार, ग्रामपंचायत मतदार संघ 869 मतदार, व्यापारी-आडते मतदार संघात 186 मतदार, हमाल-मापाडी मतदार संघात 221 मतदार, असे एकूण 2 हजार 187 मतदार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम..
27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 एप्रिलला छाननी, 6 एप्रिल ते 20 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेणे, 28 एप्रिलला मतदान व त्यानंतर तीन दिवसांच्या आत मतमोजणी, असा निवडणूक कार्यक्रम आहे.

Back to top button