नेवासा : लष्करे खूनप्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम | पुढारी

नेवासा : लष्करे खूनप्रकरणी पाच जणांची जन्मठेप कायम

छत्रपती संभाजीनगर/नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिवसेनेचे पदाधिकारी अण्णा लष्करे यांच्या हत्या प्रकरणातील सहापैकी पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे. एका आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्या. आर. जी. अवचट व न्या. आर. एम. जोशी यांच्या पीठाने हा निकाल दिला. यातील सहाही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती व एकाला ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते.

सय्यद सर्फराज अब्दुल कादर, शेख एजाज ऊर्फ मुन्ना जहागीरदार, शेख जावेद ऊर्फ पेंटर, मुनीर ऊर्फ मुन्ना निझाम पठाण व शेख राजू ऊर्फ राजू जहागीरदार अशी जन्मठेप कायम झालेल्या आरोपींची नावे असून, शेख मुस्तफा अहमद गुलाम रसूल याची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुनील चावरे व अ‍ॅड. प्रशांत बोराडे यांनी बाजू मांडली.

याबाबत माहिती अशी, औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) येथे नगर नाक्याजवळ अण्णा ऊर्फ सुनील लष्करे यांची 18 मे 2011 रोजी सोळा ते सतरा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी येथील छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेच्या दिवशी अण्णा लष्करे, त्यांची पत्नी पूजा, मुली प्रिया व वैष्णवी, लहान मुलगा आणि शेजारी राहणारा मुलगा मनोज धोत्रे हे सर्व जण नेवासा येथून औरंगाबादला खरेदीसाठी आले होते. दरम्यान, त्यांच्या कारच्या मागावर मारेकरी होते.

त्याअगोदर लष्करे यांच्यासोबत खडका फाट्यावरील पेट्रोलपंपावर मुन्ना जहागीरदार आणि मुनीर पठाण यांनी भांडण केले होते. पुढे नगर नाक्याजवळ एका नॅनो कारने लष्करे यांच्या वाहनाला धडक दिली. लष्करेंनी त्याला जाब विचारण्यासाठी कार थांबवली. याच वेळात दोन दुचाकींवरून सहा जण आले आणि त्यापैकी तिघांनी अण्णांचे हात धरले, तर उर्वरित तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान, पूजाची एका हल्लेखोराशी झटापट झाली, त्या वेळी त्याचा मोबाइल पडला. गोळ्या झाडल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले.

या प्रकरणात एकूण 38 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी पूजा लष्करे आणि मनोज यांनी आरोपींना ओळखले. आरोपी राहत असलेल्या भागातच पूजा यांचे विवाहापूर्वी वास्तव्य राहिल्यामुळे त्यांनी भाषा व इतर राहणीमानावरून आरोपींना ओळखल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात याबाबतच्या खटल्याची सुनावणी होऊन 10 ऑक्टोबर 2014 रोजी या न्यायालयाने वरील सहाही आरोपींना सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावर चार आरोपींनी स्वतंत्रपणे चार अपील खंडपीठात दाखल केले होते. या चारही अपील प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेऊन न्या. आर. जी. अवचट व न्या. आर. एम. जोशी यांनी एकत्रित निकाल दिला.

एक आरोपी जामिनावर बाहेर
शिक्षा कायम झालेल्या पाचपैखी एक आरोपी व कटामागचा सूत्रधार शेख राजू ऊर्फ राजू जहागीरदार यास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तो सध्या बाहेर आहे. आता शिक्षा कायम झाल्याने त्याला तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

म्हणून एका जणाची मुक्तता
शेख मुस्ताक अहमद गुलाम रसूल याला ओळख परेडच्या वेळी सरकार पक्षातर्फे हजर का करण्यात आले नाही, याचे सबळ कारण न दिल्यामुळे व साक्षीदार मनोज धोत्रे यांनी इतर तीनच आरोपी ओळख परेडमध्ये व घटनास्थळी होते असे ओळखणारी साक्ष दिली, त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली..

तो पूर्वनियोजित कटच होता…
अण्णा लष्करेचा मृत्यू हा अपघातातून अचानक उद्भवलेल्या भांडणाच्या कारणावरून नव्हे, तर पूर्वनियोजित कटाप्रमाणे केलेली नियोजनबद्ध हत्या होती, असे मत न्यायालयाने सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे नोंदवले आणि सहापैकी पाच आरोपींना सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

Back to top button