नगर: तलवारीने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी | पुढारी

नगर: तलवारीने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

राशीन (नगर), पुढारी वृत्तसेवा: तलवारीने केलेल्या हल्ल्यात दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात बाभूळगाव दुमाला येथील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघेही अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. हल्लेखोर हे काळ्या रंगाची चार चाकी गाडी सोडून पळून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच कर्जतचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह राशीन पोलिसांच्या पथकाने आरोपींची शोधाशोध सुरु केली. हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करून लोकांना सतर्क केले.

Back to top button