वडनेरमध्ये कुर्‍हाड दाखवित दरोडा; रोकड, सोने लंपास | पुढारी

वडनेरमध्ये कुर्‍हाड दाखवित दरोडा; रोकड, सोने लंपास

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वडनेर येथील राजेंद्र दिवे यांच्या घरांवर 6 जणांनी धाडसी दरोडा टाकला. बुधवार (दि. 22) रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा थरार घडला. दरम्यान, 6 जणांविरोधात राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र दादा दिवे (वय 53 वर्षे, रा. वडणेर, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली. दिवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी संगीता, मुलगा अक्षय व संजय, सुन राखी, बहीण कुसुम सर्व एकत्र वडनेर येथे राहतात.

ड्रायव्हर व शेती व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गावात राहणारे सारंगधर जांभुळकर यांच्यासोबत महिन्यापूर्वी दिवे यांचे किरकोळ वाद झाला होता. त्या संदर्भात राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, (दि. 21 मार्च) रोजी दिवे, पत्नी व बहिण घरात जेवण करुन झोपले होते. यानंतर (दि.22 मार्च) च्या मध्यरात्री घराचा दरवाजा लोटल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले, असता दरवाजातून सारंगधर जांभुळकर, सचिन येळे व सोमनाथ येळे यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या हातात चाकू व कुर्‍हाड होती.

यावेळी सारंगधर जांभुळकर चाकुचा धाक दाखवत त्यांना म्हणाला की, तू तुझ्या कपाटाची चावी दे, मात्र त्याला चावी देणार नाही, असे दिवे म्हणाले असता, त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्नी व बहीण जाग्या झाल्या. त्या दोघी घाबरलेल्या अवस्थेत होत्या. यावेळी दिवे त्यांच्या बहिणीला म्हणाले, तू त्यांना चावी दे, परंतु, जांभुळकर व येळे यांनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीच्या भीतीपोटी बहिणीने सारंगधर याच्याकडे चावी दिली. सारंगधर म्हणाला, तुम्ही आरडाओरड केल्यास तुम्हाला संपून टाकीन, अशी धमकी दिली. सचिन येळे व सोमनाथ येळे चाकु व कुर्‍हाड घेवुन जवळ थांबले होते. यानंतर घरातील कपाट सारंगधर याने चावीने उघडुन कपाटात ठेवलेल्या सामानाची उचकापाचक केली. 3500 रुपयांची रोकड व 60 हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, सोन्याचे ठुशी व कर्णफुले असा एकुण 63, 600 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून पोबारा केला.

दरम्यान, दिवे यांनी पाठलाग केला असता, आणखी अनोळखी तिघेजण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यांनतर शेजारी प्रदीप दिवे यांच्या घरी जाऊन घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी राजेंद्र दिवे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सारंगधर जांभुळकर, सचिन येळे, सोमनाथ येळे (तिघे रा. वडनेर, ता. राहुरी) व अनोळखी तीन जणांविरोधात कलम 395 नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. नि. मेघश्याम डांगे व पो. उ. नि. सज्जन नार्हेडा करीत आहेत.

पोलिसात तक्रार दाखल करूनही कारवाई नाही!
गुन्हा दाखल झालेले सारंगधर जांभुळकर, सचिन येळे, सोमनाथ येळे यांच्याकडून राजेंद्र दिवे यांना अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. याबाबत दिवे यांनी पोलिसात तक्रार दाखल करूनही कारवाई केली नाही. त्यामुळे थेट घरी येऊन दरोडा टाकून मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Back to top button