श्रीगोंदा : भेसळीच्या दुधाचे ओघळ ग्रामीण भागात..! | पुढारी

श्रीगोंदा : भेसळीच्या दुधाचे ओघळ ग्रामीण भागात..!

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी व्हे परमिट पावडर व लाईट लिक्विड पॅराफीनचा पुरवठा करणार्‍या कैलास लाळगे या आरोपीने रसायन खरेदी करणार्‍या डेअरी चालकांची यादीच वाचून दाखवली. त्यावरून श्रीगोंदा पोलिसांनी गुरुवारी (ता. 23) भानगाव, सुरोडी, पारगाव येथून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. यावरून भेसळयुक्त दुधाचा ओघळ श्रीगोंद्याच्या ग्रामीण भागात पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

कैलास लाळगे हा रसायन आणि पावडर पुरवठादार असून त्याला अक्कलकोट (सोलापूर) येथून अटक करण्यात आली. तपासात त्याने धक्कादायक माहिती दिली आहे. त्या आधारे संशयित आरोपींची मोठी यादी तयार झाली असून, श्रीगोंदा पोलिसांनी भानगाव, सुरोडी, पारगाव येथून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.  पारगाव येथील ज्याला ताब्यात घेतले, त्यालाच पोलिसांनी यापूर्वीही चौकशीसाठी बोलावले होते; मात्र त्या वेळी ठोस माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. आता मात्र पुन्हा त्याला ताब्यात घेतल्याने या गुन्ह्यात त्याचा निश्चित सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भेसळयुक्त दूध ग्रामीण भागातून?
सुरुवातीच्या टप्प्यात श्रीगोंदा शहराभोवतीच भेसळयुक्त दुधाचे प्रकरण फिरत होते; मात्र यात अनेक आरोपी निष्पन्न झाले असून, ते पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. पारगाव, भानगाव, सुरोडी येथील संशयित ताब्यात घेतल्यानंतर भेसळयुक्त दूध ग्रामीण भागातून येत होते का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

साय खाणार्‍याचे नाव कालव्यात!
कैलास लाळगे दूध भेसळीसाठीचे रसायन कोणाकोणाला पुरवत होता, याची माहिती त्याच्या मोबाईलमध्ये होती. मात्र त्याने तो आळेफाटा येथील कालव्यात फेकल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे भेसळीच्या दुधावरची साय खाणार्‍या मुख्य सूत्रधाराचे नावही त्या मोबाईलबरोबर कालव्यात वाहून गेले की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. हा सूत्रधार कोणीतरी बडी आसामीच असेल, असा अंदाज व्यक्त होत असून, त्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Back to top button