नगर : बाजार समित्या दोन टप्प्यात? उपनिबंधकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे | पुढारी

नगर : बाजार समित्या दोन टप्प्यात? उपनिबंधकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी नगरच्या सहकार विभागाकडून दोन टप्प्यात कार्यक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. 28 आणि 30 एप्रिल अशी दोन दिवस मतदान प्रक्रिया घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी निवडणूक प्राधीकरणाकडे मंजुरी मागितली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. राज्य प्राधीकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दोन दिवसांपूर्वीच या निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध केला होता.

यात 28 एप्रिल रोजी मतदान घेण्याचे कळविले होते. मात्र जिल्ह्यात एकाच वेळी 14 बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असल्याने सहकार विभागाची दमछाक होण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्याबाबत प्राधीकरणाकडे मंजुरी मागितल्याचे समजते.

नगर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, संगमनेर या बाजार समित्यांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान, त्यानंतर राहुरी वगळता सर्व बाजार समित्यांची मतमोजणी त्याच दिवशी; तसेच राहुरीची मतमोजणी 29 रोजी केली जावी. दुसर्‍या टप्प्यात कोपरगाव, राहाता, नेवासा, जामखेड, अकोले, श्रीरामपूर आणि शेवगाव या बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी घ्यावी, असा कार्यक्रम तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, पुरी यांच्या कार्यक्रमानुसार सर्व बाजार समित्यांसाठी 27 मार्चपासूनच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

Back to top button