राहुरी : सत्ताधार्‍यांनीच तनपुरे कारखाना तोट्यात घातला : अमृत धुमाळ | पुढारी

राहुरी : सत्ताधार्‍यांनीच तनपुरे कारखाना तोट्यात घातला : अमृत धुमाळ

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर कर्जाचे पुनर्गठण करताना विद्यमान संचालक मंडळाने 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कर्जाची हमी घेतली होती. त्यामुळे जिल्हा बँकेने सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर जप्ती करण्याऐवजी संचालक मंडळाच्या संपत्तीवर जप्ती करायला हवी होती. या संचालक मंडळाने सत्ता आली तेव्हा 267 कोटी रुपये कर्जात असणारा कारखाना आज 550 कोटी रुपये तोट्यात नेऊन घातला आहे, असा आरोप अमृत धुमाळ, राजुभाऊ शेटे आदींनी पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परीषदेत अमृत धुमाळ पुढे म्हणाले, डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाली. याबाबत विद्यमान संचालक मंडळाने बचाव कृती समितीवर चुकीचे आरोप केले आहेत. या बाबतची आपल्या उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उद्या सुनावणी आहे. मागील सुनावणीत मुदत संपल्यावर मुदतीत निवडणूक का घेतली नाही? याबाबतीत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे न्यायालयाने साखर संचालकांना दिले आहेत. म्हणून प्रशासक मंडळ नियुक्त झाले. आमच्या समितीचा व माजी खा. प्रसादराव तनपुरे यांचा कोणताही संबंध नाही.ते आमचे बोलावते धनी नाहीत.

डॉ. तनपुरे कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने राहुरी येथे अमृत धुमाळ, राजुभाऊ शेटे, अ‍ॅड. पंढरीनाथ पवार, संजय पोटे, बाळासाहेब जठार, दिलीप इंगळे, बाळासाहेब गाढे, रामदास वने, अशोक ढोकणे आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अमृत धुमाळ म्हणाले की, चेअरमन नामदेव ढोकणे व संचालक मंडळाने जे आरोप केले ते बिनबुडाचे व हास्यास्पद आहे. माझी पत्नी शैलजा धुमाळ संचालक असताना तसेच अभ्यासू व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ नेते सुभाष पाटील हे देखील संचालक मंडळात होते, असे असताना तिथे गैरकारभार झाला हे म्हणने हास्यास्पद आहे.

राजूभाऊ शेटे म्हणाले की, डॉ. तनपुरे कारखाना संचालक मंडळाने अद्याप कामगार व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पेमेंट अदा केलेले नाही. कारखाना निवडणूक प्रक्रिया लांबविण्यासाठीच हेतूतः निवडणूक निधी भरण्यासाठी संचालक मंडळाने टाळाटाळ केली. भंगार विक्री झाली, कोट्यवधींची जमीन विकली गेली. खा.डॉ. सुजय विखे यांनी कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना बचाव कृती समितीने चालवावा, असे जाहीर सांगितले. मग आता पूर्ण ताकदीने पुन्हा ताब्यात घेण्याची भाषा का करत आहेत. इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यांनी कोणत्या तरी एका वाक्यावर ठाम राहावे, असे सांगितले.

कै. धुमाळांची सभासदांना आठवण
कै. रामदास पाटील धुमाळ यांनी अध्यक्ष असताना प्रतिटन2100रुपये भाव ऊसाला दिला. त्यामुळे ऊस उत्पादकांचे कल्याण झाले. त्यांनी केलेल्या कारभाराची आजही सभासदांना आठवण असल्याचे बाळासाहेब जठार यांनी सांगितले.

Back to top button