शिर्डीला आता स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; शासनाला प्रस्ताव | पुढारी

शिर्डीला आता स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; शासनाला प्रस्ताव

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न भलेही कित्येक वर्षांपासून राजकारणाच्या गर्तेत अडकला असला, तरी आता जिल्ह्याच्या उत्तरेकडील सहा तालुक्यांच्या सोयीसाठी शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय करावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे शिर्डी मुख्यालय असलेल्या नव्या जिल्ह्याची ही पूर्वतयारी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असून, महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी, जनतेचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव शासन दरबारी धाडण्यात आलेला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा प्रस्ताव पाठविला आहे. या कार्यालयासाठी शिर्डी येथील शेती महामंडळाची जमीन उपलब्ध असल्याचेही या प्रस्तावात नमूद केले आहे. मान्यता मिळाल्यास उत्तर जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव या सहा तालुक्यांसाठी शिर्डीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके असून, क्षेत्रफळ 17 हजार 49 चौ.कि.मी. आहे. जिल्हा उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत विभागला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अधिकार्‍यांची दमछाक होते. जनतेचा वेळ आणि पैसा याची बचत व्हावी आणि प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि जलद व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी होत आहे. मात्र राजकीय वादामुळे अजून विभाजनाचे घोगडे भिजत पडले आहे.

अधिकारी-कर्मचार्‍यांच्या 23 पदांची आवश्यकता
स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी 1, उपजिल्हाधिकारी 1, तहसीलदार 1, नायब तहसीलदार 1, लघुलेखक 1, अव्वल कारकून 7, महसूल सहायक 10 व वाहनचालक 1 असे एकूण 23 पदे भरावी लागणार आहेत.

अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील कामे
शासकीय वसुली, गौण खनिज, ब व क वर्ग नगरपरिषद तसेच ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवस्थापन, जमाबंदी, जमीन सुधार, ग्रामपंचायत निवडणूक व इतर, पुनर्वसन असे 39 विषय, तसेच अर्धन्यायिक स्वरूपाची कामे यांचा समावेश आहे. जमिनीविषयक अनेक सुनावण्यांतही ते व्यस्त असतात. प्रसंगी राजशिष्टाचारविषयक जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते.

अधिपत्याखालील तालुके व गावे
संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव या सहा तालुक्यांतील 657 गावांचा समावेश आहे. या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ 6 हजार 132 चौ.कि.मी. असून, लोकसंख्या 20 लाख 13 हजार 149 इतकी आहे.

Back to top button