पाथर्डी : दैत्य पूजनाने नववर्षाची सुरुवात ! पाडव्याला यात्रोत्सव | पुढारी

पाथर्डी : दैत्य पूजनाने नववर्षाची सुरुवात ! पाडव्याला यात्रोत्सव

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणार्‍या निंबादैत्य नांदूर गावात मराठी नववर्षारंभीच दैत्याची पूजा केली जाते. श्री निंबादैत्य महाराजांचा यात्रोत्सव पाडव्याच्या दिवशी असल्याने अनेक वर्षापासून ही परंपरा आजही सुरूच आहे. दैत्य महाराज हे ग्रामदैवत असून गावात हनुमंताचं नाव घेणेही टाळले जाते.

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी येथील दैत्यनांदूर या एकमेव गावात दैत्याची पूजा होते. गावात दैत्याचे मंदिरही आहे. गावाची ओळखही त्याच नावाने. विशेष म्हणजे हा दैत्य नवसालाही पावतो. तीन दिवस चालणार्‍या यात्रोत्सवात पाडव्याचा मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा कुस्त्या, तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक, महाआरती अशी विविध कार्यक्रम यात्रेदरम्यान होतात.

डॉ. सुभाष देशमुख हे देवस्थान सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष असून बाबासाहेब वाघ हे यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. दिगंबर गाडे, एकनाथ पालवे, चंद्रकांत जोशी, मधुकर दहिफळे, एकनाथ काकडे, आजिनाथ दहिफळे, भुजंग काकडे, नामदेव नांगरे, हरिभाऊ फाजगे, नारायण वाघ, चंद्रकांत देशमुख, सुधीर दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, भागवत वाघ, नारायण गर्जे, कानिफनाथ वाघ, बाळासाहेब नरसाळे यांचा उत्सवासाठी नेहमीच पुढाकार असतो.

परदेशीही येतात घरी
गावात मारूती, हनुमान अशी मुलांची नावे ठेवली जात नाहीत. दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील प्रथा आजही पाळते आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त राज्य,देश-परदेशात असलेले नागरिक पाडव्याला निंबादैत्याच्या यात्रेला हमखास येतात. येथील भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर, गाडीवर तसेच दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत.

Back to top button