नेवासा तालुक्यातील शिवरस्त्याचा श्वास कोंडलेलाच; नोटिसा बजावूनही अतिक्रमणे हटेनात | पुढारी

नेवासा तालुक्यातील शिवरस्त्याचा श्वास कोंडलेलाच; नोटिसा बजावूनही अतिक्रमणे हटेनात

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा-मुकिंदपूर-हंडीनिमगाव शिवरस्ता मोकळा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर महसूलच्या नियंत्रणात वर्षभरात भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून मोजमापे घेऊन हद्दीच्या खुणाही केल्या. नेवासा तहसीलदारांनी संबंधितांना केवळ नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, अद्यापि हा रस्ता मोकळा झाला नाही.

नेवासा महसूल विभागाकडून संबंधित 36 लोकांना 1 मार्च 2023 पर्यंत अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. अन्यथा अतिक्रमणे काढण्याचा इशारा दिला होता. परंतु अद्यापि यासंदर्भात हालचाली दिसत नसल्याचे तक्रारदार श्रीधर चिमणे व प्रितम साळुंके यांनी म्हटले आहे.

नेवासा-मुकिंदपूर शिवरस्त्यावर थेट हंडीनिमगाव हद्दीपर्यंत 33 फूट लांबीचा शिवरस्ता अतिक्रमणात आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठात श्रीधर चिमणे यांनी याचिका केली होती. त्यावर सुनावणी होऊन शिवरस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. खंडपीठाने नगरच्या जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिवरस्ता मोकळा करण्याचा आदेश नेवासा तहसीलदारांना दिला. त्यानंतर केवळ नोटिसाच बजावण्यात आल्या. आता पूर्वीच्या तहसीलदारांची बदली झाली. आता नव्याने आलेल्या तहसीलदारांनी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आहे. दरम्यान, याप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

तहसीलदारांमुळेच हा प्रश्न रेंगाळला?

तालुक्यातील अन्य अनेक शिवरस्ते मोकळे झाले. हाच शिवरस्ता मोकळा करण्यास नेमकी काय अडचण येते. तत्कालीन तहसीलदारांनी हा प्रश्न भिजत ठेवल्याचा आरोप स्थानिक रहिवासी देवीदास साळुंके यांनी केला असून, न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button