नगरमध्येही कोयता गँगची लूट; घरफोडीत 9 लाख लंपास | पुढारी

नगरमध्येही कोयता गँगची लूट; घरफोडीत 9 लाख लंपास

नगर; पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगाव उपनगरातील नवनाथनग येथे कोयत्याच्या धाक दाखवत दोन घरात चोरी झाली आहे. बुधवारी (दि.22) मध्यरात्री चौघांनी दागिने व रोकड असा नऊ लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ भाऊसाहेब भोर (रा.नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

भोर यांना घराचा दरवाजा वाजल्याचा आवाज आल्याने ते जागे झाले. तोंडाला रुमाल व मास्क असलेले चौघे त्यांना दिसले. एकाने नवनाथ व त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, तर तिघांनी कपाटातून दागिने व दोन लाखाची रोकड घेत पोबारा केला. भोर यांच्या जवळच असलेल्या अंबादास भागुजी वाकळे यांच्या घरातही कोयता गँगने चोरी केली. वाकळे यांनाही कोयत्याचा धाक दाखवत 4 लाख 85 हजारांचा ऐवज लुटून नेला आहे. 3 लाखाची रोकड व सोन्याचे दागिने गँगने लंपास केले.

चोरीनंतर केली दगडफेक
भोर यांच्या घरात जीवे मारण्याचा धाक दाखवून चोरी केली. घरातील रोख व दागिने चोरल्यानंतर भोर यांच्यावर एका चोरट्याने दगडफेक केली. चारही चोरटे जवळील शेतातून पळून गेले.

Back to top button