कर्जत : यंदा चांगला पाऊस, पिकेही उत्तम; गोदड महाराज संवत्सरीतील भाकीत | पुढारी

कर्जत : यंदा चांगला पाऊस, पिकेही उत्तम; गोदड महाराज संवत्सरीतील भाकीत

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : या वर्षी चांगला पाऊस पडून धान्यसमृद्धी होईल आणि लोकांमध्ये मैत्रीभाव वाढून लोक सुखी राहतील, असे भाकीत संत सद्गुरू गोदड महाराजांच्या संवत्सरात म्हणजे होईकमध्ये करण्यात आले. मात्र रोगराई वाढण्याचा आणि वादळ व अतिवृष्टीचा धोकाही त्यात व्यक्त करण्यात आला आहे. कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराजांनी मोठी ग्रंथसंपदा लिहून ठेवली आहे. विविध क्षेत्रातील लिखाण करतानाच त्यांनी जागतिक पातळीवरील भविष्य लिहून ठेवले आहे. प्रत्येक वर्षी चैत्र पाडवा या दिवशी या भविष्याचे वाचन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

बुधवारी मंदिरामध्ये हभप पंढरीनाथ काकडे व अनिल काकडे यांनी या वर्षीचे भाकीत (होईक) महाराजांच्या संवत्सरीवरून सांगितले. या वेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षीच्या संवत्सराचे नाव शुभनाम आहे. या वर्षी चांगला पाऊस पडून, धान्यसमृद्धी होणार आहे. लोकांमध्ये मैत्री वाढून लोक सुखी राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षी आगामी काही महिन्यांत सर्वत्र जोरदार वादळ व अतिवृष्टीचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. खरीप हंगामामध्ये पाऊस ओढ देणार असून, त्यानंतर भरपूर पाऊस पडून धान्यदेखील भरपूर येणार आहे. धरण व मोठ्या नद्या ज्या परिसरात आहेत, त्या भागात भरपूर व जोरदार पाऊस असल्याचे त्यात सांगण्यात आले.

युद्धाचा धोका
जागतिक पातळीवर मात्र युद्ध सुरू राहणार असून, काही देशांचे विघटन म्हणजे तुकडे होण्याचा व त्यामुळे युद्धाचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.

मंदीची झळ
सध्या सर्वत्र मंदी आहे आणि आणखी पुढील काळामध्येदेखील मंदीचे सावट सर्वच क्षेत्रांमध्ये राहणार आहे, असेही भाकीत या होईकमध्ये करण्यात आले.

Back to top button