नगर : शवदाहिनी खरेदीचे 17 लाख चर्चेत ! वाढीव दराने खरेदी | पुढारी

नगर : शवदाहिनी खरेदीचे 17 लाख चर्चेत ! वाढीव दराने खरेदी

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शवदाहिनी खरेदी केली जाणार आहे. मात्र, ही खरेदी अतिशय गोपनियरित्या सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पुणे झेडपीने 50 हजारात खरेदी केलेली शवदाहिनी नगर झेडपीतून 67हजारांना खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे वाढीव 17 लाखांचे गौडबंगाल काय, या प्रश्नातून ही खरेदी वादात सापडणार असल्याचे चित्र आहे.

पुण्याच्या कंपनीची निवड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातून सेसमधून 100 शवदाहिनी खरेदी करण्यासाठी निविदा काढली होती. त्यासाठी तीन ठेकेदार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यात केडगावची रुपरतन, पुणेची पूजा एटंरप्रायजेसची निविदा 70 हजारांच्या आसपाच होत्या.तर पुणेची प्रियंका एजन्सीची सर्वात कमी निविदा ही 66 हजार 960 रुपये आली आहे. त्यामुळे शवदाहिनीची काम हे पुण्याच्या प्रियंकाला देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

17 हजार वाढीव दराने खरेदी?
पुणेे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनात मे 2022 मध्ये 50 हजारांप्रमाणे शवदाहिनी खरेदी करण्यासाठी मंजूरी दिली होती. मात्र, सहा महिन्यांत नगर जिल्हा परिषदेने शवदाहिनीसाठी 67 हजारांप्रमाणे खर्चाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हे जास्तीचे 17 हजाराचे गौडबंगाल काय, याविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, प्रशासक येरेकर यांनी ही खरेदी थांबवून, पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सामान्य नगरकरांमधून केली जात आहे. (समाप्त)

पुणे जिल्हा परिषदेने पर्यावरण दृष्ट्या उपयुक्त ठरणारी शवदाहिनी उभारलेल्या आहेत. त्यासाठी प्रति शवदाहिनी उभारण्यासाठी 54 हजारांचा खर्च आला आहे.

                          -सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे

नगर झेडपीतून 100 शवदाहिन्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्वात कमी निविदा 66760 रुपयांची आहे. पुरवठा आदेश देणे बाकी आहे.

                            – सुरेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नगर

Back to top button