नगर : वरूर, खरडगाव नदीतून वाळू उपसा | पुढारी

नगर : वरूर, खरडगाव नदीतून वाळू उपसा

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : वरूर, खरडगाव नदीतून बेसुमार वाळू उपसा होत असून, दिवस-रात्र वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील वरूर, खरडगाव, आखेगाव, भगूर नदी पात्रातून अनेक दिवसांपासून बेसुमार वाळू वाहतूक सुरू आहे. सध्या नदी पात्रातले पाणी आटल्याने पात्रात ठिकठिकाणी असणार्‍या वाळुचा राजरोस उपसा होत आहे. याच परिसरातील काही वाळू तस्कर पहाटे, रात्री-अपरात्री उपसा करतात. आडमार्गा किंवा सरळ राज्यमार्गाने वाळू वाहतूक सुरू आहे. या तस्करांवर पोलिस करवाई करत नाही, उलट कारवाईचा आदेश आल्यास संबंधीत वाळू तस्करांना याबाबत माहिती दिली जाते.

होणारा बेसुमार वाळू उपसा नदी पात्राला व वाहतुकीला घातक आहे. वाळू उपशाने शासनाचा महसूल बुडविला जातो, तसेच नदी काठच्या शेत जमिनीचे मोठे नुकसान होते. क्षमते पेक्षा जास्त चोरून वाहतूक करणार्‍या वाळू वाहनाने आखेगाव रस्त्यासह इतर रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. तसेच, अपघाताच्या घटना घडत आहेत. या वाळू वाहतुकीबाबत अनेक तक्रारी असताना पोलिस व महसूल याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. सध्या मार्च अखेर असून, महसूल प्रशासनास ठराविक वसुलीचे उदिष्ठ दिले आहे. या गांवाच्या नदीतून होणार्‍या वाळू उपशाबाबत महसूल व पोलिसांनी सतर्क होऊन या वाहनांवर कडक कारवाईची नागरिकांमधून मागणी होत आहे. याबाबात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल, असे नागरिकांचे म्हणने आहे

Back to top button