नगर : बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला ! | पुढारी

नगर : बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला !

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून वेध लागलेल्या जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. 28 एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असून, 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी तसे पत्र काढले आहे. जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपलेला आहे.

सध्या बाजार समित्यांवर प्रशासक कारभार पाहत आहेत. त्यामुळे सहकारातील या निवडणुका नेमक्या कधी होणार, याकडेच इच्छुकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, नूतन ग्रामपंचायत सदस्य, तसेच सोसायटीच्या संचालकांचा मतदार यादीत समावेश करून नुकतीच अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समित्यांचा राजकीय धुराळा लवकरच उडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून नगर सहकार विभागाला कालच या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत. यात बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निश्चितीबाबतही कळविण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी या पत्रान्वये 27 मार्च रोजी कार्यक्रम जाहीर करणार आहेत.

नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिनांक हा 3 एप्रिल असणार आहे. अर्जांची छाननी 5 एप्रिल रोजी होईल. वैध अर्जांची यादी 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. 20 एप्रिलपर्यंत अर्ज माघारीची मुदत राहील, माघारी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप 21 एप्रिल रोजी होईल व 28 एप्रिल रोजी मतदान होऊन त्यानंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. या संदर्भात उपनिबंधक पुरी हे निर्णय घेणार आहेत. या निवडणुकीत ग्रामपंचायत व सोसायटी मतदार संघातून शेतकर्‍यालाही उमेदवारीची संधी असणार आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्ये ठरणार आहे.

Back to top button