नगर : जुनी पेन्शनचे आश्वासन; चेहर्‍यावर हसू, मनात आसू ! | पुढारी

नगर : जुनी पेन्शनचे आश्वासन; चेहर्‍यावर हसू, मनात आसू !

नगर; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शनच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू असलेला संप राज्य शासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर अखेर काल मागे घेण्यात आला. सुकाणू समितीच्या अध्यक्षांनी ही घोषणा करताच नगर जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनी या भूमिकेचे स्वागत करत तत्काळ कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कर्मचारी युनियनचे ज्येष्ठ सदस्य शिवाजी भिटे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे आदींनी दिली. दरम्यान, या निर्णयाविषयीही काही कर्मचार्‍यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ हा नारा देत जि.प.च्या 14 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला होता.

काल संपाचा सातवा दिवस होता. यावेळी कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे यांनी आंदोलनस्थळी पोतराजाला पाचारण करून जुनी पेन्शनसाठी शासनावर आसूड उगारल्याचे दिसले. यावेळी कर्मचार्‍यांनी थाळीनादही केला. दरम्यान, दुपारी 4 नंतर सुकाणू समिती आणि शासनाची सकारात्मक चर्चा झाली.

यामधून ठोस आश्वासन मिळाल्याने संपातून माघार घेण्याचा निर्णय समितीच्या अध्यक्ष काटकर यांनी घेतला. शासनाने चांगला प्रतिसाद दिल्याने जि.प. कर्मचार्‍यांनीही जल्लोष करत संप मिटल्याचे जाहीर केले. या आंदोलनाचे नेतृत्व जि.प. कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संजय कडूस, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभय गट, प्रमोद राऊत, मुकेश कुलथे, भाऊ कुर्‍हे, संदीप वाघमारे, गोपीनाथ गिते, मनोज चोभे, संतोष जाधव, नाना लाटणे, सागर आगरकर, अरूण माळी, अनिल सोनवणे, योगीराज वारुळे, सुमित चव्हाण, प्रवीण बुरा, संजय छायीलकर आदींनी केल्याचे पहायला मिळाले.

शासनाने तोंडाला पाने पुसले!
संघटनेच्या वरिष्ठांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संपातून माघार घ्यावी लागत आहे. शासनाने केवळ शब्द देवून कर्मचार्‍यांची निराशा केली आहे. जर फक्त शब्दच घ्यायचा होता, तर सात दिवस कामबंद आंदोलन कशाला केले, असाही सवाल काही कर्मचार्‍यांनी करताना नाराजी व्यक्त केल्याचे दिसले.

Back to top button