पाथर्डी : हिशेब मागणार्‍यांनी किती निधी आणला? आ. मोनिका राजळे यांचा सवाल | पुढारी

पाथर्डी : हिशेब मागणार्‍यांनी किती निधी आणला? आ. मोनिका राजळे यांचा सवाल

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : विकासकामांच्या निधीचा हिशेब मागणार्‍या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती निधी आणला, हे सांगावे. मी विरोधकांना नव्हे, जनतेला हिशेब देण्यास बांधील आहे. भगवानगड परिसर पाणी योजनेसाठी 2015 पासून कोणी पाठपुरावा केला, हे जनतेला माहीत आहे. उगाच या योजनेचे श्रेय घेण्याची धडपड सुरू आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता टीका केली.

पागोरी पिंपळगाव ते साकेगाव पाडळी या अडीच कोटी खर्चाच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी राजळे बोलत होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी सभापती सुनीता दौंड, काकासाहेब शिंदे, विष्णुपंत अकोलकर, सागर फडके, अजय रक्ताटे, सरपंच छाया दराडे, अनिल बोरुडे, भगवान साठे, श्रीकांत मिसाळ आदीे उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या,2014 ते 19 या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी मोठा निधी मिळाला होता. विरोधक गेल्या आठ वर्षांतील हिशेब मागत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही, त्यामुळे विकासकामे ठप्प झाली होती. सरकार बदलल्यानंतर गेल्या आठ महिन्यात चांगला निधी मिळाला आहे. केंद्र व राज्य सरकारविषयी विरोधक खोटे आरोप करतात. ते भाजप कार्यकर्ते खोडून काढतील, असा विश्वासही राजळे यांनी व्यक्त केला. शहादेव दराडे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र दराडे यांनी आभार मानले.

Back to top button