नगर तालुका : औषधी वनस्पती अन् प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार | पुढारी

नगर तालुका : औषधी वनस्पती अन् प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुक्याला सुमारे साडेसात हजार हेक्टर वनक्षेत्र लाभले आहे. गर्भगिरीच्या डोंगर रांगांमध्ये आढळणार्‍या दुर्मिळ औषधी वनस्पती अन् विविध वन्य प्राणी, तसेच अनेक प्रजातींच्या पक्षांचा मुक्त संचारामुळे तालुका पर्यटकांसाठी ‘नंदनवन’ ठरत आहे.
गर्भगिरीच्या टेकड्या, खोल दर्‍या.. पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे धबधबे अन् मुक्तपणे संचारणारे वन्य प्राणी, असे विहंगम दृश्य तालुक्यात ठिकठिकाणी पहावयास मिळते. त्यामुळे डोंगरगण, इमामपूर, गुंडेगाव, गोरक्षनाथ गड, आगडगाव, देवगाव असे विविध ठिकाणे निसर्गप्रेमींना नेहमीच आकर्षित करतात. 21 मार्च आंतरराष्ट्रीय जंगल दिन आहे.

नगर तालुक्यातील वन विभागाच्या चार मंडलामध्ये साडेसात हजार हेक्टर क्षेत्र वन आहे. त्यातील 750 हेक्टर क्षेत्र आर्मीचे (डेअरी फार्म) आहे. जेऊर मंडलात दोन हजार 200 हेक्टर क्षेत्र असून, त्यातील 500 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे. कवडगाव मंडलात एक हजार 120 हेक्टर क्षेत्र असून, यातील 240 हेक्टर क्षेत्र आर्मीचे आहे.

गुंडेगाव मंडलात एक हजार 900 हेक्टर क्षेत्र, तर नगर मंडळात दोन हजार हेक्टर क्षेत्र वन विभागाचे आहे. एकंदरीत तालुक्याला सुमारे साडेसात हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभलेली आहे. हिरवेगार डोंगर..खडकावरून खळखळणारे पाणी…मोरांच्या केकावण्याचा आवाज…मध्येच हरणांचा बागडणारा कळप…अवकाशात मुक्त विहार करणारे पक्षी, असे विहंगम दृश्य नगर तालुक्यात पाहावयास मिळते.

तालुक्यातील दुर्मिळ औषधी वनस्पती
ग्रामीण भागात आजही जुने शेतकरी पक्ष्यांच्या सांकेतिक भाषेवरून हवामानाचा अंदाज लावत आहेत. परंतु, दिवसेंदिवस पक्ष्यांची घटती संख्या ही चिंताजनक बाब आहे. दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिनाच तालुक्यातील वनक्षेत्रात आढळून येतो. कडुनिंब, रान तुळस, कोरफड, आडुळसा, निरगुडी, कुडा, सराटा, गुलबक्षी, सिंदाड माकड, एरंड, पळस, रान कांदा, निलगिरी, तरवड, गुळवेल, बांडगुळ, टणटणी, अशा अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती येथील वनक्षेत्रात आढळतात.

तालुक्यातील वन्य प्राणी, पक्षी
वनक्षेत्रात हरीण, काळवीट, चिंकारा, तरस, कोल्हा, लांडगा, साळींदर, ससा, बिबट प्राणी आढळतात, तर चिमणी, साळुंकी, कावळा, कोळसा, पोपट, बगळा, ढोकरी, करकोचा, शराटी, चक्रवाक चार, सुतार, धीवर, मोर, टिटवी, शेकाट्या, पारवा, होला, कोकीळा, पावशा, भारद्वाज, घुबड, पिंगळा, गावपाकोळी, बुलबुल, शिंपी, सुगरण, हळद्या, पाणकोंबडी याबरोबर विविध जातीचे पक्ष आढळतात.

नगर तालुक्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. येथे नव्याने बिबट सारख्या प्राण्यांचा वावर देखील आढळून येतो. येथील जंगलात दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. जंगलातील मानवी हस्तक्षेप कमी होणे, तसेच वनसंपदेचे जतन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.

                                     -सुवर्णा माने, उपवनसंरक्षक, नगर

आपल्या देशामध्ये आवश्यकतेपेक्षा खूपच कमी प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे जंगलाचे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात शेतकर्‍यांनी डोंगराच्या कडेला बांध जाऊ नये. जेणेकरून वणवा लागून वनसंपदेला धोका पोहोचेल.

                                                – मनेष जाधव, वनपाल वन विभाग

वनांचे प्रमाण वाढवण्यासाठी गावोगावी वृक्ष लागवड चळवळ राबवणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन व पर्जन्यमानासाठी जंगलांची गरज आहे.
                                         – बंडू पवार, माजी उपसरपंच, जेऊर

Back to top button