बारामती अ‍ॅग्रोवर कारवाईने मानसिक संतुलन ढासळले : डॉ.गावडे | पुढारी

बारामती अ‍ॅग्रोवर कारवाईने मानसिक संतुलन ढासळले : डॉ.गावडे

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : बारामती अ‍ॅग्रोवरील कारवाईमुळे कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, अशी टीका भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे यांनी केली आहे. बारामती अ‍ॅग्रो नावाने शेटफळ गडे येथील साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने दिल्याने राज्यात खळबळ उडाली. आमदार राम शिंदे यांनी विधीमंडळात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई होत आहे. असे असताना व्यवस्थापक सुभाष गुळवे मात्र आमदार शिंदे यांच्यावर गरळ ओकत आहेत.

शेतकरी हितासाठी कारखाना सुरू केल्याचे ते सांगतात. अतिरिक्त उसासाठी आमदार शिंदे यांनी शेतकर्‍यांसह रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उसाचे टिपरू शिल्लक ठेवणार नाही असे म्हणणारे कारखाना बंद करण्याचे निवेदन देत होते. त्यावेळी त्यांचे शेतकर्‍यांवरील प्रेम कुठे गेले होते. शासनाने जाहीर केलेल्या गाळप तारखेच्या अगोदर कारखाना सुरू करून शेतकर्‍यांचे काय हित साधणार होते, असा सवाल गावडे यांनी केला आहे.

शेतकरी हितासाठी आम्ही कारखाना लवकर चालू केल्याचे आमदार रोहित पवार म्हणतात. तर, कारवाई झाल्यानंतर कारखाना सुरू केला नाही, फक्त क्लिनिंग केले, असे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे म्हणतात. मग, आता कोणाचे खरे मानायचे?
गुळवे हे आपल्या धन्यासाठी बेताल बडबडत आहेत. आमदार शिंदे यांच्यावर आरोप करताना भाषेचा तोल सांभाळावा. अन्यथा, त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर मिळेल, असा इशारा डॉ.गावडे यांनी दिला आहे.

Back to top button