करंजी : प्रभागरचना बदलाने अनेकांचा हिरमोड; सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी | पुढारी

करंजी : प्रभागरचना बदलाने अनेकांचा हिरमोड; सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी

करंजी; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना झाली आहे. त्यामध्ये अनेक प्रभागांत फेरबदल व सदस्य संख्येतही बदल झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान प्रभागएकमधून दोनच सदस्य निवडून गेले होते. आता या प्रभागातून तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत.

प्रभाग दोनमधून दोन सदस्य निवडून गेले होते. आता तेथून दोनऐवजी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. प्रभाग तीनमधून पूर्वी तीन सदस्य निवडून दिले होते. आता दोनच सदस्य निवडावयाचे आहेत. प्रभाग चारमधून दोनच सदस्य निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक पाचमध्ये दोनऐवजी तीन जागा झाल्या आहेत. एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी असून, सरपंच पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रभाग रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे. करंजी ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचा कार्यकाल दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे आणखी सात महिन्यांनी पूर्ण होत आहे. त्या अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक होईल. त्यासाठी आतापासूनच राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.

Back to top button