पारनेर : वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पोखरी-वारणवाडी शिवारात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सापळा लावत वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करीत एका आरोपीस ताब्यात घेतले. पोखरी येथील भीमाबाई महादू पवार (रा फरतारे वस्ती यांच्या घरी चोरी झाल्यामुळे पोलिस पथक पोखरी शिवारात काल पहाटे गस्त घालत होते.
पारनेरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना खबर्यामार्फत लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक पोखरी-वारणवाडी रस्त्यावर करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ गस्तीवरील पथकाला कारवाईचा आदेश दिला. वारणवाडी शिवारात कैलास अनिल जाधव (वय 34, पवळदरा,ता.पारनेर) ट्रॅक्टर ट्रालीमध्येे एक ब्रास वाळू घेऊन चालल्याचे आढळले. पोलिसांनी वाळूच्या ट्रॅक्टरसह तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सूरज कदम यांनी फिर्याद दाखल केली.