पाथर्डी तालुका : तीनशे हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान; फळबागांना अधिक फटका | पुढारी

पाथर्डी तालुका : तीनशे हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान; फळबागांना अधिक फटका

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात झालेल्या गारपिटीने प्राथमिक माहितीनुसार सुमारे तीनशे हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रविवारी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी संयुक्तिक गारपीट झालेल्या भागाची प्राथमिक पाहणी केली. महसूलचे तलाठी, कृषीचे मंडल अधिकार्‍यांना आल्हणवाडी, घुमटवाडी, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, पिंपळगाव टप्पा, करोडी भागातील गारपिटीने झालेल्या शेतीचे नुकसान करण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिले आहेत.

शेतकर्‍याच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या गारपिटीने हिरावून घेतला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीचे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. प्रशासनाच्या पाहणी दौर्‍या दरम्यान आल्हणवाडीचे ग्रामस्थ राधाकिसन कर्डिले, परमेश्वर गव्हाणे, आजिनाथ सावक आदी उपस्थित होते.

नुकसानीची मदत त्वरित देण्याची मागणी
गारपीट भागाच्या पाहणीत फळबागांमध्ये डाळिंब, संत्रा, आंबा, कांदा, गहू, हरभरा आणि मका पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीनशे हेक्टर शेतीतील फळबागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या पाहणी दौर्‍यानिमित्त शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करून भरीव मदत त्वरित देण्याची मागणी केली.

Back to top button