काष्टी : पारधी समाजाच्या मुलांना आता बोलीभाषेतून शिक्षण | पुढारी

काष्टी : पारधी समाजाच्या मुलांना आता बोलीभाषेतून शिक्षण

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील लोकशिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रमोद काळे यांच्या संकल्पनेतून आदिवासी पारधी समाजाच्या वाघरी या बोलीभाषेत इयत्ता पहिली ते चौथीची बालभारतीची पाठ्यपुस्तके अनुवादित करण्यात आली आहेत. पहिलीच्या पुस्तकाचे लोकार्पण मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

झिरवळ म्हणाले, शिक्षणासाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असून, हा उपक्रम नीटपणे समजून घेण्याची इच्छा असल्याने यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल. काळे म्हणाले, आदिवासी पारधी समाज सार्वजनिक कार्यक्रमांसह इतरही घरगुती कार्यक्रम नसतो. त्यामुळे इतर समाजातील लहान मुलांसोबत या समाजातील मुलांना संधीच नसल्याने एक ते सहा वयोगटातील मुलांना वाघरी भाषाच अवगत असते. त्यांना मराठी भाषा काहीच समजत नाही. परिणामी त्यांचा अध्ययनस्तर कमी राहतो. परिणामी त्यांचा शिक्षणातील रस कमी होतो.

तो शाळेत जाण्यास टाळाटाळ करतो व शालाबाह्य होतो. तो कधीही यातून बाहेर निघत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात व त्यांचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांना बोलीभाषेतून शिक्षण देण्यासाठी पहिली ते चौथीची बालभारतीची पाठ्यपुस्तके अनुवादित केली जात आहेत. चांगले परिणाम दिसून येत आहेत.

यावेळी साहित्यिक नामदेव भोसले, दादाजी पारधी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मतिन भोसले, आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जितेंद्र काळे, बाबूसिंग पवार, संतोष जाधव, लक्ष्मी काळे, रजनी पवार, संतोष पवार, श्याम भोसले, अजित भोसले, राहुल भोसले, विजय भोसले, परशुराम चव्हाण, नवनाथ भोसले, नितीन भोसले, नवनाथ भोसले, स्वप्निल पवार उपस्थित होते.

Back to top button