नगर तालुका : बायजामाता टेकडी अतिक्रमण चिघळणार? ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन | पुढारी

नगर तालुका : बायजामाता टेकडी अतिक्रमण चिघळणार? ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता टेकडी परिसरात झालेल्या अतिक्रमणांचे प्रकरण चिघळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. टेकडीच्या पायथ्याशी केलेल्या अतिक्रमणावरून गावामध्ये धुसफूस सुरू झाली असून, टेकडी परिसरात विनापरवाना केलेले कंपाऊंड कढण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जेऊरचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिर गर्भगिरीच्या टेकडीवर वसलेले आहे. तसेच मंदिराच्या एका बाजूने हनुमान चौथरा असून, येथे धार्मिक स्थळ आहे. याच परिसरात पायर्‍यांच्या बाजूने मुस्लिम समाजाने तारेचे कंपाउंड विनापरवाना केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या जागेची नोंद सरकारी म्हणून आहे. पूर्वी डोंगराची नोंद बायजामाता डोंगर म्हणून होती. परंतु आता सरकार (खळी वाडगा) अशी नोंद झाली आहे. मुस्लिम समाजाने परवानगी न घेता येथे कंपाऊंड केले.

ही जागा कब्रस्तानची असल्याचे सांगण्यात येते. परंतु येथे 40 ते 50 वर्षात एकही दफनविधी झाला नाही. तसेच मुस्लिम समाजाला सन 1984 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी मशीद व कब्रस्तानसाठी 19 गुंठे सरकारी जागा दिली आहे. जुन्या वाघवाडी रस्त्यालगत देखील कब्रस्तान आहे. सन 1984 ंमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी दोन समाजांत वाद नको म्हणून मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी जागा दिली, तरी हिंदूधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी परिसरात अतिक्रमण केल्याने गावातील वातावरण कलुषित झाले आहे. धार्मिक स्थळाजवळ अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बायजामाता मंदिराच्या टेकडीची तत्काळ मोजणी करून अतिक्रमण हटवावे. बायजामाता धार्मिक स्थळाची मोजणी करून हद्द कायम करावी. सद्यस्थितीतील कंपाऊंड हटवून अतिक्रमण होणार नाही, यासाठी टेकडीच्या क्षेत्राची हद्द कायम करून कंपाऊंड करावे. तसेच अनधिकृत कंपाऊंड करणार्‍यांवर कारवाई करावी. हिंदू धार्मिक स्थळाशेजारी कब्रस्तान, तसेच अन्य कारणांसाठी जागा देऊ नये. त्यासाठी ग्रामस्थांचा कायम विरोध राहील. निवेदनावर 500 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. बायजामाता टेकडी परिसरात झालेल्या अतिक्रमणावरून गावात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे.

वाद मिटविण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांचे प्रयत्न

एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी मागील महिन्यात तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी मागील आठवड्यात घटनास्थळी भेट देऊन सदर वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button