‘त्या’ दुधाला नगरच्या रसायनाची साय ! रॅकेटच्या मास्टरमाईंडसह ५ जण ताब्यात | पुढारी

‘त्या’ दुधाला नगरच्या रसायनाची साय ! रॅकेटच्या मास्टरमाईंडसह ५ जण ताब्यात

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : काष्टीतील घातक रसायनयुक्त कृत्रिम दुधाच्या रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप मखरे यास श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीनंतर आणखी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कृत्रिम दुधासाठी वापरले जात असलेले रसायन नगरमधील एका डिलरकडून घेतल्याचे समोर आले असून, त्याचा शोध सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी काष्टी येथे बाळासाहेब बाबूराव पाचपुते याच्या घरी छापा टाकून रसायनयुक्त 460 लिटर कृत्रिम दूध पोलिसांच्या मदतीने नष्ट केले. तेथून व्हे परमिट पावडर व लाईट लिक्वीड पॅराफीनचा मोठा साठा जप्त केला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संदीप मखरे यास अटक केल्यानंतर त्याने हे रसायन कुणाकुणाला पुरविले जात होते, याची माहिती दिली. त्याच्या आधारे पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

संदीप मखरेची स्वतःची डेअरी असून, तेथे साडेसहा हजार लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यातील किती दूध कृत्रिम होते, याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचे सहा महिन्यांची माहिती असलेले रजिस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यातून शेतकर्‍यांकडील दूध किती आणि भेसळयुक्त किती याचा उलगडा होणार आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलिसांनी आतापर्यंत सात संशयित ताब्यात घेतले असले, तरी या गुन्ह्याची व्याप्ती नक्कीच मोठी असल्याने लोकांच्या जीवाशी खेळून कोट्यवधी रुपये कमावणार्‍या भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी होत आहे.

नगरमधून रसायन विक्री?
दरम्यान, हे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले व्हे परमिट पावडर व लाईट लिक्वीड पॅराफीन हे रसायन नगरमधील एका डिलरकडून खरेदी करून तालुक्यात विक्री केले जात होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्या डिलरचा शोध सुरू असून, त्याच्या चौकशीतून कृत्रिम दुधाच्या या धंद्यात जिल्ह्यातील आणखी किती जण आहेत, त्याचा उलगडा होणार आहे.

त्या प्लँट चालकाविरुद्ध कारवाई होणार?
भेसळयुक्त दूध तयार करणारे मोठे रॅकेट उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या गुन्ह्यातील संशयितांकडील दूध श्रीगोंदा शहरातील एक प्लँटवर विकले जात असल्याचे समोर आले आहे. हा उद्योग गेल्या काही महिन्यांपासून बिनदिक्कत सुरू आहे. भेसळयुक्त दूध खरेदी करणाराही तितकाच दोषी असल्याने त्याच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Back to top button