राहुरीत चारचाकी वाहनचोरी सत्र सुरूच | पुढारी

राहुरीत चारचाकी वाहनचोरी सत्र सुरूच

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरात घराच्या पाठीमागील बाजूस लावलेली सुमारे दोन लाख रुपये किमतीची बोलेरो प्लस चारचाकी गाडी एका अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश संजय साबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. साबळे हे राहुरी शहरातील जुने बस स्थानक परिसरात बालाजी मंदिर रोड येथे रहावयास आहे. त्याच्याकडे घरगुती वापरासाठी महिंद्रा कंपनीची बोलेरोही गाडी दोन वर्षापूर्वी खरेदी केली होती.

रात्रीच्यावेळी त्यांनी गाडी पाठीमागील अंगणात लावली. सकाळी ही गाडी त्या ठिकाणी नव्हती. घरातील लोकांनी बोलेरो गाडीचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र गाडी मिळून आली नाही. साबळे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडी मध्यरात्री दीड वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात भामट्याने चोरून नेल्याचे जुने बस स्थानक परिसरातील राज्य महामार्गावर असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले.

Back to top button