

सिद्धटेक; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळा शनिवारपासून सुरू केली. उच्चशिक्षित तरूण त्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी सरसावले आहेत. पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजल्याने मुलांचे चेहरे आनंदाने फुलले.
कोरोनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता कुठेतरी शैक्षणिक वातावरण सुरळीत होत असताना जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांनी ऐन परीक्षेच्या काळात संप पुकारला. शिक्षकांनी आंदोलन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करायला हवे होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून येण्यासारखे नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
अशी संतप्त भावना पालकांनी व्यक्त केल्या. ग्रामस्थ व पालकांच्या आवाहनास प्रतिसाद देत गावातील आश्विनी लोंढे, सागर दळवी, प्रदीप पोटे या उच्चशिक्षित शिक्षकांनी मुलांना शिकवण्याचे मान्य केले. सकाळी साडेसात वाजता प्रार्थनेने शाळेला सुरुवात झाली. पाढे, कविता, धडेे वाचन, गणिती प्रक्रिया यात मुले रमून गेली होती.