राहुरी : शासकीय शिक्षण व्यवस्थेला बळकटी द्या : आ. तनपुरे | पुढारी

राहुरी : शासकीय शिक्षण व्यवस्थेला बळकटी द्या : आ. तनपुरे

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शासकीय शाळांची झालेली दुरवस्था पाहता शासनाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण परिसरात शासकीय शैक्षणिक शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक शाळा इमारत नसल्याने उघड्यावर भरतात, ही राज्यकर्त्यांसाठी खेदाची बाब आहे. शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी शासनाने शैक्षणिक क्षेत्राला बळकटी देण्याची मागणी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात केली.

ग्रामविकास विकासाच्या मागण्यांवर चर्चा करताना, आ. तनपुरे म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांची मोठी वाताहात झाली. शहर व ग्रामीण भाग अशी मोठी दरी निर्माण झाली आहे. राज्यात अनेक शाळा उघड्यावर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इ. 1 ली ते 4 थीपर्यंत असलेल्या शाळा दोन खोल्यांमध्येच भरतात. शहरामध्ये धनदांडग्यांच्या मुलांना एका वर्गामध्ये दोन शिक्षक शिकवतात तर ग्रामीण भागामध्ये मात्र दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे एकच शिक्षक शिक्षण देतो.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणार्‍या काही शाळांमध्ये शिक्षण देणारे शिक्षक इंग्रजी विषय शिकविण्यात निपुण नसतात. अशा काही इंग्रजी शाळांमध्ये नैपुण्य नसलेले शिक्षकांमुळे मुले ना इंग्रजी परिपूर्ण शिकतात ना मराठी, अशी परिस्थिती पाहता शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे आ. तनपुरे म्हणाले. शिक्षण व्यवस्था बदलताना शासकीय शाळांमधील शिक्षकांना शैक्षणिक कामे वगळता इतर कामकाजाचा व्याप कमी केला पाहिजे. शिक्षकांना केवळ शिक्षणाचेच काम देणे गरजेचे झाले आहे. यासह शिक्षकांना अत्याधूनिक शिक्षणाचे उपयुक्त ज्ञान मिळावे, असे ते म्हणाले.

वांबोरी ग्रामीण रूग्णालयाचा मुद्दा अधिवेशनात
राज्यातील ग्रामीण रुग्णालयांच्या समस्यांबाबत अधिवेशनात झालेल्या चर्चेत आ. तनपुरे यांनी सांगितले की, वांबोरी येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रात्री- अपरात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने एका सर्वसामान्याचा बळी गेला. अशा पद्धतीने वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या वेळी थांबतच नसल्याने याबाबत शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी आ. तनपुरे यांनी केली.

Back to top button